

कराड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने नवीन ऊर्जा मिळाली असे प्रतिपादन लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा 105 वा जयंती सोहळ्याचे निमित्ताने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने समाजप्रबोधन व सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना अॅड.संभाजीराव मोहिते यांच्या हस्ते शाल, मानपत्र व सन्मान चिन्ह,रोख रक्कम व फुले पगडीने ’ सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2025’ ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, स्वागताध्यक्ष रामभाऊ दाभाडे, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा.मच्छिंद्र सकटे, प्रा.डॉ.शरद गायकवाड, माजी नगरसेवक सौरभ पाटील, धनगर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण काकडे, शिवानी मुंढेकर, प्रा.पै.अमोल साठे, गजानन सकट,जगन्नाथ चव्हाण,अमोल जाधव, पै.अक्षय सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.प्रकाश आमटे म्हणाले, सामाजिक विषमतेच्या झळा सोसताना अण्णा भाऊंना शाळेच्या वर्गाबाहेर बसवले गेले. मात्र तरीही अत्यंत प्रतिकूलतेवर मात करुन शोषितांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडत अण्णा भाऊ साठे यांनी जगभर नाव कमावले अशा स्फूर्तिदीप असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने मानवतेची ध्वजा ऊंचावण्यासाठी नविन ऊर्जा मिळाली.
विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या कर्तृत्ववान व्यक्तींचाही यावेळी समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी बी.आर. पाटील, मराठी अभिनेत्री शिवानी मुंढेकर, सामाजिक कार्यकर्ते जावेद नायकवडी, डॉ. एम. बी पवार, कॉ. सुनील भिसे, वैशाली भोसले, वसंतराव पाटील, पै.किरण साठे, जगन्नाथ सोनावणे यांना समाज गौरव पुरस्काराने तर संवेदनशील कवी प्रकाश नाईक यांच्या ’या शकलांना सांधुया’ या दीर्घ कवितेस प्रा़ हरी नरके स्मृती साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी प्रबोधानत्मक कविता सादर केल्या.
प्रास्ताविक प्रमोद तोडकर यांनी तर, प्रा. दीपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. हरिभाऊ बल्लाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश सातपुते, राहूल वायदंडे, दत्ता भिसे ,सूरज घोलप, भास्कर तडाखे, कृष्णा लोखंडे, संजय तडाखे, कृष्णा लोखंडे, अण्णा पाटसुपे, संजय थोरात यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.