

वेणेगाव : मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत 567 निर्णय घेत शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम केले आहे. शेतकऱ्यांचा मुलगा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास हा जनतेच्या आशीर्वादामुळेच शक्य झाला आहे. ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही. राज्याचा सर्वांगीण विकास हा एकमेव अजेंडा असून अंगापूर गावासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. बळीराजाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अंगापूर, ता. सातारा येथे ना. एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, सह संपर्कप्रमुख हणमंतराव जगदाळे, जि.प. सदस्य राजू शेळके, संदीप मांडवे, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नंदकुमार नलवडे, गणपत कणसे, धोंडीराम कणसे, जयसिंग कणसे, पोपटराव कणसे, सरपंच प्रियंका निकम, ऋषिराज कणसे, प्रफुल्ल कणसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शिवम डोंबे यांनी सूत्रसंचलन केले. सुभाष जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ग्रामदैवत एवार्जीनाथचे दर्शन घेतले. त्यानंतर गावातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ना. शिंदे म्हणाले, महायुतीला जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे विधानसभेत ऐतिहासिक 232 जागा मिळाल्या. त्याचप्रमाणे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही मोठा पाठिंबा मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले. असेही त्यांनी ठामपणे सांगितले. अंगापूरमधील एक गाव एक गणपती ही संकल्पना याचा आदर्श इतर गावांनी घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. ना. शंभूराज देसाई म्हणाले, अंगापूरला पर्यटनाचा दर्जा देण्यात आला असून, गावाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्याचे काम सातत्याने सुरू राहील, असे सांगितले.