महाबळेश्वर : पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावली टोकचिरेखिंड परिसरात गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. मुंबईहून लाखवड येथे आपल्या गावी परत येत असताना वॅग्नर कार सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलादपूर पोलिसांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले.
या अपघातात अजय सुनील संकपाळ, तुकाराम संकपाळ, सुनील संकपाळ, पार्थ संकपाळ आणि संगीता संकपाळ हे प्रवासी जखमी झाले. लाखवड गावचे काही ग्रामस्थ मुंबईहून गावी येत होते. पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील बावली टोकचिरेखिंड दरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने वॅग्नर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खोल दरीत कोसळली. घाटातील हा भाग अत्यंत धोकादायक असल्याने अपघातानंतर वाहन थेट सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत जाऊन अडकले.
या घटनेची माहिती प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य संकेत सावंत आणि ऋषिकेश जाधव यांना मिळताच त्यांनी तातडीने टीमच्या ग्रुपवर संदेश देत सर्व सदस्यांना सतर्क केले. माहिती मिळताच अजित जाधव, अनिकेत वागदरे, संकेत सावंत आणि ऋषिकेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनाही अपघाताची माहिती देण्यात आली. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर शोध मोहिम राबवली.