

केळघर : विटा ते महाबळेश्वर या राज्यमार्गाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा, दीडशे वर्षांहून अधिक काळ अविरत सेवा देणारा आंबेघर येथील रामजीबुवा मंदिरालगतचा ब्रिटिशकालीन पूल बुधवारी मकर संक्रांतीच्या दिवशी काळाच्या पडद्याआड गेला. या ठिकाणी नव्या पुलाच्या उभारणीचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे.
केळघर, मेढा, सातारा मार्गावरील हा पूल आंबेघर तर्फे मेढा (ता. जावली) परिसरातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरला आहे. वेण्णा नदीवर उभारलेला हा ब्रिटिशकालीन पूल आर्च पद्धतीने कोरीव दगड व चुन्याच्या मिश्रणातून बांधण्यात आला होता. सुमारे 150 वर्षांनंतरही या पुलावरुन रहदारी सुरु होती, हे त्याच्या मजबुतीचे उदाहरण होते. सन 2020 मध्ये विटा ते महाबळेश्वर राज्यमार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सुमारे 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.
मात्र ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे या पुलासह केळघर बाजारपेठेतील एका लेनचे काम, बसस्टॉप तसेच काही किरकोळ कामे रखडली होती. आता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकारातून या पुलाच्या नव्या उभारणीसाठी आठ कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै 2021 मधील महापुराच्या वेळी या पुलावर तब्बल पाच फूट पाणी वाहून गेले होते, तरीही हा पूल दिमाखात उभा राहिला होता, अशी माहिती ज्येष्ठ जाणकारांनी दिली. कालमर्यादा संपूनही तो अखेरपर्यंत वाहतुकीस सेवा देत राहिला.
पुलाशेजारी असलेले रामजीबुवा मंदिर हे प्रवाशांचे श्रद्धास्थान असून अनेक प्रवासी येथे थकवा घालवण्यासाठी विसावा घेत असत. आज हा ऐतिहासिक पूल पाडण्यात आला असला, तरी तो अनेक पिढ्यांच्या स्मृतींमध्ये अढळ राहणार आहे. नवीन उभारण्यात येणारा पूल दर्जेदार असावा व पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त होत आहे.