

सातारा/परळी : सातारा-सज्जनगड रस्त्यावरील अंबवडे खुर्द (ता. सातारा) येथे रविवारी सकाळी पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात होऊन दोन 16 वर्षीय मुलांचा मृत्यू झाला. वेदांत शरद शिंदे व प्रज्वल नितीन किर्दत (दोघे रा. अंबवडे खुर्द) अशी ठार झालेल्या मुलांची नावे आहेत. दोन्ही दोस्तांचा अपघातात जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, राहुल भरत देवरे (वय 28, रा. सायळी पो. दहिवड, ता. सातारा) हा युवक जखमी झाला आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सकाळी 11 वाजता हा अपघात झाला आहे. अंबवडे खुर्द येथून पिकअप चालक पांडुरंग विठ्ठल गावडे (वय 42, रा. भेंडवाडी, पो. आसनगाव ता. सातारा) हा मार्बल, ग्रेनाईट घेऊन निघाला होता. दोन्ही वाहने अंबवडे खुर्द आल्यानंतर भीषण अपघात झाला. यावेळी दुचाकीवरील दोन्ही मुले उडून पडली व गंभीर जखमी झाली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
अपघाताची माहिती गावात वार्यासारखी पसरल्यानंतर ग्रामस्थ व मुलांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी मुलांना रुग्णालयात नेल्याचे समजल्यानंतर कुटुंबिय तेथे पोहचले. तोपर्यंत सातारा तालुका पोलिसांना अपघाताची माहिती समजली. पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. मात्र उपचारापूर्वीच मुलांचा मृत्यू झाला असल्याचे समजले. मुलांचा मृत्यू झाल्याचे ऐकताच कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. पोलिसांनी दुपारी घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर सायंकाळी उशीरा मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मुलांचे मृतदेह कुटुंबियांना देण्यात आले.
अपघातप्रकरणी पिकअप चालक पांडूरंग गावडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत त्याच्याकडे पोलिस कसून चौकशी करत होते. मात्र अपघात नेमका कसा झाला? हे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले नव्हते. यामुळे पोलिस घटनास्थळ व परिसरातील ग्रामस्थांचे जाबजबाब घेत होते. त्यामध्ये तफावत येत होती.