

सातारा शहरातील सराईत गुन्हेगार असलेल्या आमीर मुजावर टोळीला (एएम) पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दणका देत तडीपार केले. या टोळीमध्ये एकूण पाचजणांचा समावेश असून, दोन वर्षे त्यांना हद्दपार करण्यात आले आहे.आमीर इम्तियाज मुजावर (वय 23, रा. पिरवाडी, ता. सातारा), आमीर सलीम शेख (वय 23, रा. वनवासवाडी, कृष्णानगर ता. सातारा), अभिजित ऊर्फ आबू राजू भिसे (वय 21, रा. सैदापूर, ता. सातारा), यश सुभाष साळुंखे (वय 19, रा. मोळाचा ओढा, सातारा), अलिम नजीर शेख (वय 19, रा. आयटीआय रोड, मोळाचा ओढा, सातारा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
या टोळीवर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून करणे, दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत पोहचवणे, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करून दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्राचा वापर करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर संशयितांवर पोलिसांनी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. याउलट या टोळीची समाजात दहशत वाढत होती. त्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोनि राजेंद्र मस्के यांनी या टोळीविरुध्द प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक समीर यांच्याकडे पाठवला. त्यानुसार पोलीस अधीक्षक यांच्यासमोर सुनावणी होवून या टोळीला दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश करण्यात आले.