

खेड : सैनिक स्कूल मार्गावरील पोलिस अधिक्षक बंगला ते मिलिटरी दवाखाना दरम्यान बुधवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेले ज्येष्ठ नागरिक राजा रानडे यांना पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे सांगून एका दुचाकी स्वाराने थांबवून घेतले. पण रानडे यांच्या प्रसंगावधाने त्या तोतया पोलीस कॉन्स्टेबलने धूम ठोकली. या प्रसंगामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला. याची बुधवारी दिवसभर विसावा नाका परिसरात चर्चा रंगली होती.
रानडे हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता दुचाकीवरून आलेल्या एकाने मी कॉन्स्टेबल आहे, मोठे साहेब तुम्हाला हाक मारत होते, असे सांगितले. संशयिताने ओळखपत्र दाखवले मात्र रानडे यांना संशय आल्याने त्यांनी हे खोटे असल्याचे सांगितले. तसेच दुचाकीची नंबरप्लेटही कोरी असल्याचे सांगितले. यानंतर तोतया पोलिसाने धूम ठोकली. यानंतर रानडे यांनी पोलिसांना फोन करून या प्रकराची माहिती दिली. त्यावर पोलिसांनी पोलिस ठाण्यात येवून तक्रार द्या, असे सांगितले. या घटनेची बुधवारी विसावा नाका परिसरात मोठी चर्चा रंगली होती. सकाळच्या वेळी निर्जन रस्त्यावर नागरिकांना पोलीस असल्याचे सांगून थांबवण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा घटना पोलिसांनी गांभीर्याने घ्याव्या, अशी मागणी होत आहे.