

सातारा : अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. दिवस शुभ असल्याने अनेकांनी खरेदीचा शुभमुहूर्त गाठला. त्यामुळे सराफी बाजारपेठेत आर्थिक व्यवहारात तेजी आली होती. इलेक्ट्रिकल वस्तू, वाहन व गृह प्रकल्पांमध्ये आर्थिक उलाढाल वाढली होती. दरम्यान, अक्षय्यतृतीयेनिमित्त विविध मंदिरांमध्ये फळांची विशेष आरास करण्यात आली होती.
अक्षय्यतृतीयेला घरोघरी कलश पूजन करुन आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यात आले. साडे तीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी नागरिक घर, गाडी किंवा चांगली गुंतवणूक करतात. या मुहूर्तावर केलेल्या खरेदीमुळे घरात कायम समृद्धी रहाते, असे मानले असल्याने दीर्घकाळासाठी त्याचा फायदा होतो. तसेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेली पूजा आणि दान अक्षय्य फळ देते. माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने धनाची प्राप्ती होते. अक्षय्य तृतीयेला नवीन वस्तू किंवा वाहन तसेच वास्तुच्या खरेदीसाठी शुभमुहूर्त गाठला. त्यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढली.
सध्या सोन्याच्या दरात कमालीची वाढ झाली असली तरी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोने व चांदीचे शिक्के, देवीदेतवतांच्या चांदीतील प्रतिमा आदिंची यथाशक्य खरेदी केली. लग्न सराई असल्याने शुभकार्यातील दागिन्यांची खरेदी अक्षय्य तृतीयेला करण्यात आली. त्यामुळे सराफी बाजरपेठ ग्राहकांमुळे गजबजली होती. सराफी पेठेतही आर्थिक उलाढाल वाढली होती. एकूणच अक्षय्य तृतीयेला बाजारपेठेत कोटींची उड्डाणे झाली. दरम्यान, अक्षय्य तृतीयेला श्रीखंड पुरी, आमरस पुरीचा बेत आखला जातो. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक झाली असून नागरिकांमधून चांगली मागणी होती.
दरम्यान, अक्षय्य तृतीयेनिमित्त जलदान तसेच आंब्याचे दान ही देण्याची प्रथा आहे. सातारा शहरातील पंचमुखी गणेश मंदिरात आंबा, अननस, संत्री, मोसंबी, केळी, श्रीफळ यांसह विविध फळांची तर यादोगोपाळ पेठेतील श्रीमुरलीधर मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेला नवीन खरेदी त्याचबरोबर शुभकार्य व शुभ वास्तूसाठी अक्षय्यतृतीयेचा शुभमुहूर्त साधला. अनेकांनी नवीन घराची वास्तुशांती व गृहप्रवेशाचा श्रीगणेश केला. खरेदी केलेल्या नवीन वाहनाचीही पूजा करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागात वास्तुशांती व कलश पूजनासाठी धांदल उडाली होती. शुभ कार्यामुळे भटजींना मागणी वाढली होती.