सातारा : सातारा जिल्ह्यात पहिल्यापासून चांगले कार्यकर्ते, चांगले पत्रकार, चांगली जनता आहे. मी अर्थमंत्री म्हणून काम करत होतो, त्यावेळी सातार्याला मी झुकते माप दिले आहे. मला इतरांचे काही सांगता येत नाही, पण मी इथे सर्व बाजू व्यवस्थित करणार आहे. सातारा जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी देणार, हा माझा शब्द आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. मकरंद पाटील यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी देण्याचे संकेतच दिले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला. यानंतर महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अजितदादांनी सोमवारी कराड येथील प्रितीसंगमावर येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आ. मकरंद पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. सचिन पाटील, विजयसिंह यादव आदींची उपस्थिती होती.
आ. अजित पवार म्हणाले, मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, या ठिकाणी मला काम करायला आवडते. जिल्ह्याचा विचार मी कालही केला, आजही करतोय आणि उद्याही करत राहणार जिल्ह्याला मंत्रीपद देणार आहेे. दरम्यान, अजितदादांच्या या वक्तव्यातून आ. मकरंद पाटील यांना मंत्रीपद मिळणार असल्याचेच संकेत प्राप्त झाले आहेत. सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे वाई मतदार संघातून आ. मकरंद पाटील व फलटणमधून सचिन पाटील हे दोन आमदार निवडून आले आहेत. मकरंदआबा यांचे राष्ट्रवादीसाठी असलेले योगदान पाहता त्यांनाच मंत्रीपद दिले जाणार असल्याचे आ. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात उत्साहाला उधाण आले असून कार्यकर्ते व पदाधिकारी चार्ज झाले आहेत.