

सातारा : राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुकीमध्ये ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. वाई, रहिमतपूर, पाचगणी, महाबळेश्वर या राजकीय संवेदनशील असलेल्या शहरांमध्ये अजित पवार गट स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत असून त्यादृष्टीने मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शत-प्रतिशत भाजपचे वारे घुमायला लागले आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते ना. मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील आणि शिवसेनेचे नेते ना. शंभूराज देसाई यांनी नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुती घडवून आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, हे प्रयत्न फोल ठरले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बाजूला ठेवूनच भाजपची चाल सुरु झाली आहे. महाबळेश्वर, वाई, पाचगणी या नगरपालिकांत भाजप शिरकाव करण्याच्या तयारीत असतानाच ना. मकरंद पाटील यांनी सावध पवित्रा घेत सर्वप्रथम या तिन्ही पालिकांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या तिन्ही पालिकांमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह नगरसेवकपदाच्या उमेदवारांची यादी तयार झाली आहे. घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे.
काहींना एबी फॉर्म दिले गेल्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला ना. मकरंद पाटील आणि खा. नितीन पाटील यांनी रहिमतपूर पालिकेमध्ये वर्चस्व असणाऱ्या सुनिल माने यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करवून घेतला. रहिमतपूर पालिकेमध्ये शिरकाव करण्यासाठी आ. मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली चित्रलेखा माने-कदम यांच्या गटाने सुनिल माने यांना शह देण्याची तयारी केली असतानाच सुनिल माने यांना बळ देण्याचे काम राष्ट्रवादी अजित पवार गटाने केले आहे. निवडणूक लागलेल्या 9 पालिकांपैकी चार नगरपालिकांत तर राष्ट्रवादीने स्वबळ आजमावले आहे. म्हसवड पालिकेतही भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुती तोडून महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेतले आहे.