

प्रवीण शिंगटे
सातारा : ‘त्या दुःखद घटनेनंतर बुधवारी मनवे अण्णांनी उठून गाडीची चावी हातात घेतली, क्षणभर थांबले. मागे वळून पाहिलं, कोणीच नव्हतं. समोर स्टेअरिंगवर हात ठेवला पण मनात विचारांचं काहूर उठलं, काळजात कालवाकालव झाली. 27 वर्षांपासून रोज तोच चेहरा, तोच करारी आवाज, तीच सवय. आज मात्र सारं भयानक होतं. सारं अवसानच गळून पडलं होतं.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा यांच्या अपघाती निधनाने केवळ राजकीय पोकळी निर्माण झालेली नाही, तर असंख्य मनांमध्ये न भरून येणारी वेदना घर करून बसली आहे. या दुर्घटनेने एक असंही नातं उद्ध्वस्त केलं, जे 27 वर्षांपासून न बोलता बोलत होतं. ते म्हणजे दादांच्या गाडीचे सारथ्य करणारे शामराव नारायण मनवे (अण्णा) व अजितदादांचं. अण्णांंची अशीच एक दर्दभरी कहाणी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील परळी खोऱ्यातील मनवेवाडी या छोट्याशा गावातून आलेले, अजितदादांच्या आयुष्यात सावलीसारखे वावरणारे अण्णा हे नाव. 1999 पासून अजितदादांच्या गाडीचं सारथ्य करणारे मनवे अण्णा केवळ चालक नव्हते, ते दादांच्या प्रत्येक धावपळीचे साक्षीदार, प्रत्येक थकलेल्या क्षणात आधार आणि प्रत्येक प्रवासातील विश्वास होते.
गाडीच्या सीटवर बसलेला नेता आणि स्टेअरिंगला हात ठेवणारा चालक या नात्याच्या पलीकडे जाऊन, काळाच्या ओघात या दोघांचं जणू काय कुटुंबच झालं. पुण्यातील बालेवाडी येथील मनवे अण्णांच्या घरी गणपतीला दादांनी जेवायला येणं, ही केवळ औपचारिकता नव्हती, तर त्या नात्याची साक्ष होती. मंगळवारी रात्री मुंबईतील कामकाज लवकर आटोपलं. थकलेले दादा, शांत रात्र आणि रिकामे रस्ते असंच ते वातावरण होतं. त्या क्षणी मनवे अण्णांनी एक साधा, पण मनापासूनचा सल्ला दिला.‘दादा, आपण आजच कारने निघूया, रात्रीच पोहोचू’. तो सल्ला अनुभवातून आलेला होता. रस्त्यांचा, वेळेचा आणि दादांच्या सुरक्षिततेचा. पण दादांनी सकाळी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला अन् बुधवारी सकाळी 8.50 वाजता बारामती विमानतळावर लँडिंग करताना तो भयावह प्रसंग घडला. दादा सर्वांनाच कायमचे सोडून गेले.
दुर्घटनेनंतर मनवे अण्णा बोलत होते, पण शब्द नव्हते. डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर अपराधी भाव आणि मनात एकच प्रश्न,‘दादांनी माझं ऐकलं असतं तर?, मी दादांचा निर्णय कधीच बदलू शकलो नाही. पण आज वाटतं, त्या रात्री थोडा जास्त आग्रह केला असता तर....’ पुढचं वाक्य अपूर्ण राहिलं. कारण काही वेदनांना पूर्णविराम नसतो. आज मनवे अण्णांची गाडी उभी आहे. स्टेअरिंग तसंच आहे, सीट तशीच आहे पण मागची जागा कायमची रिकामी आहे. 27 वर्षांचा प्रवास थांबला आहे, पण आठवणींचा प्रवास कधीच थांबणार नाही. महाराष्ट्राने एक नेता गमावला आहे, पण मनवे आण्णांनी आयुष्याचा एक भाग.
अण्णा अन् दादा हे नातं हृदयात कोरलं...
‘सकाळी दादा गाडीत बसायचे, पेपर चाळायचे. कधी काही बोलायचे, कधी गप्प. आज सगळं शांत आहे’, हे सांगताना मनवे अण्णांच्या आवाजात दुःख नव्हतं, रिकामेपणा होता. 1999 साली सुरू झालेला हा प्रवास कधीच ‘ड्रायव्हर-साहेब’ असा राहिला नाही. रस्ता बदलला, सत्ता बदलली, पण मनवे अण्णा आणि दादा हे नातं तसंच हृदयात कोरलेलं राहिलं.