सातारा : नांदवळमधून बारामतीतील काटेवाडीत स्थिरावलेल्या शरद पवार यांच्या कुटुंबावर सातारा जिल्ह्यातील जनतेने जीवापाड प्रेम केले. पवार कुटुंबावरील असलेला विश्वास हेच या प्रेमामागचं मूळ कारण आहे. शरद पवारांचा हात धरून राजकारणात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील साताऱ्याच्या जनतेने तितकाच विश्वास ठेवला अन् त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रेमही केले. अजितदादांवर आरोप होत असतानाही साताऱ्याच्या जनतेने मात्र दादा या आरोपांतून तावून-सुलाखून बाहेर निघतील हा विश्वास दाखवत त्यांना राजकीय बळ दिले. सातारकरांच्या याच प्रेमातून उत्तराई होत अजितदादांनी साताऱ्याच्या मातीचे ऋण फेडले. साताऱ्यात झालेली अन् होऊ घातलेली विकासकामं ही त्यांचीच देण ठरली आहेत. दादांच्या अचानक जग सोडून जाण्यानं साताऱ्याच्या विकासाचा सह्याद्री काळोखात हरपला. मात्र त्यांच्यामुळे उमटलेल्या विकासाच्या पाऊलखुणा दादांच्या कर्तृत्वाची तहहयात साक्ष देतील.
1. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रवासात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान केवळ राजकीय नाही, तर ते नात्याचे, ऋणाचे आणि मातीशी जोडलेल्या प्रेमाचे आहे. अजितदादांचे म्हणजेच पवार कुटुंबीयांचे मूळ गाव कोरेगाव तालुक्यातील नांदवळ. बारामतीतून देशभर राजकीय दबदबा निर्माण करणाऱ्या पवार परिवाराची नाळ मात्र आजही नांदवळच्या मातीशी घट्ट बांधली आहे. म्हणूनच सातारा हा जिल्हा अजितदादांसाठी केवळ प्रशासकीय घटक नाही, तर तो आपलासा, जिव्हाळ्याचा आणि हक्काचा आहे.
2. सातारा शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी अजितदादांनी भरीव, दूरदृष्टीपूर्ण आणि दीर्घकालीन ठसा उमटवणारी कामे केली. सातारा मेडिकल कॉलेजमुळे आरोग्यसेवेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. गरीब रुग्णांना पुण्या-मुंबईकडे धाव घ्यावी लागू नये, ही काळजी या मागे होती. साताऱ्याची हद्द वाढवून शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यात आली. त्यांच्या संकल्पनेतून सातारा शहरात अत्याधुनिक जिल्हा क्रीडा संकुल उभे राहिले. खेळाडूंना स्वप्ने पाहण्याचे व्यासपीठ मिळाले. महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्याने सह्याद्रीच्या सौंदर्याला जागतिक ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न झाला.
3. इतिहासाचा साक्षीदार किल्ले अजिंक्यतारा संवर्धनामुळे पुन्हा तेजाने उजळला. औंधचा पर्यटनात्मक विकास म्हणजे कला, इतिहास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळालेली चालनाच ठरला. सातारा शासकीय विश्रामगृह उभारून प्रशासकीय सोयीसुविधांना बळ मिळाले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुष्काळी भागाला पाणी देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. ही कामे केवळ यादी नाहीत; ही साताऱ्याच्या विकासाची पायाभरणी आहे. ही देण म्हणजे कागदावरची आकडेवारी नाही, तर रुग्णाच्या श्वासातला दिलासा, शेतकऱ्याच्या पिकातलं पाणी, तरुणाच्या डोळ्यातलं स्वप्न आणि इतिहासाच्या दगडातलं जतन आहे.
4. राज्याच्या तिजोरीची चावी अजितदादांकडे होती. मात्र, आपल्याकडे अर्थमंत्रीपद आहे म्हणून ठराविक लोकांसाठीच निधीची तरतूद न करता संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यांसमोर ठेवून निधीचे त्यांनी वाटप केले. सातारा जिल्ह्यावर मात्र अजितदादांचे विशेष प्रेम होते, ते त्यांनी अनेकदा आपल्या कृतीतून दाखवून दिले. नांदवळच्या मातीचा ऋणानुबंध जपत, साताऱ्याच्या भविष्याचा आराखडा आखणारे अजितदादा पवार हे नाव म्हणून नव्हे, तर विश्वास म्हणून साताऱ्याच्या मनात आजही जिवंत आहे आणि इथून पुढची कित्येक वर्षे राहील, यात कोणतीच शंका नाही.