

मारूल हवेली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात देखील शोककळा पसरली असून, गुरुवारी अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटणसह नवारस्ता व मल्हारपेठ या प्रमुख बाजारपेठा ठप्प ठेवण्याचा निर्णय स्थानिक नागरिकांनी घेतला.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. पाटण तालुक्यात देखील अनेकांनी हळहळ व्यक्त केली. गुरूवारी सकाळपासून प्रमुख बाजारपेठांसह गावागावात, वाडीवस्तीवर शुकशुकाट जाणवू लागला होता. पाटण, नवारस्ता, मल्हारपेठ, विहे, मारूल हवेली परिसरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते, व्यापारी, हॉटेल्स मालक, डॉक्टर्स, वकिलांनी घटनेचा दुखवटा पाळून स्वयंस्फूर्त बंद ठेवत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा, वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे मल्हारपेठ भागातील सर्वच गावात बंद पाळला व सर्व पक्षांकडून प्रचार यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला लागलेल्या सर्व पक्षांनी वाहने बंद केली व नियोजित प्रचार सभा रद्द केल्या. पाटण तालुका भाजपच्या वतीने दि.30 जानेवारी पर्यत जाहीर सभा, मेळावे रद्द केले आहेत.