Ajinkyatara fort: अजिंक्यतारावर स्वराज्याचा तेजोत्सव

मशालींनी गड उजळला; शिवकाल अवतरल्याचा भास
Ajinkyatara fort
Ajinkyatara fortPudhari
Published on
Updated on

सातारा : स्वराज्याचे तेजस्वी प्रतीक असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्यावर सातारा पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती महोत्सवात हजारो मशाली पेटवून मशाल महोत्सव उत्साहात पार पडला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या ऐतिहासिक गडावर उजळलेल्या मशालींनी संपूर्ण परिसर तेजोमय झाला आणि ‌‘जय भवानी, जय शिवाजी‌’ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रेरणेने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमासाठी साताऱ्यातील नागरिक, युवक-युवती, विविध सामाजिक संघटना, तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळ होताच गडावर पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात शिवभक्तांनी मशाली प्रज्वलित केल्या. या महोत्सवाचा शुभारंभ शिवेंद्रराजे भोसले यांनी केला. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर, निशांत पाटील, राजू गोरे आदी नगरसेवक उपस्थित होते.

शिवजयंतीनिमित्त किल्ले अजिंक्यतारा येथे नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवगर्जना आणि देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले. उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याची आठवण करून दिली.

गडाच्या तटबंदीवर, महादरवाज्याजवळ आणि विविध ठिकाणी रांगेत मशालींनी एक अद्भूत दृश्य निर्माण केले. दूरवरून पाहताना संपूर्ण किल्ला जणू जाज्वल्य अग्निकुंडासारखा तेजस्वी भासत होता. पारंपरिक मशालींच्या माध्यमातून प्रकाशोत्सव साजरा करण्यात आला. अजिंक्यतारा किल्ल्यावर जणू शिवकाल पुन्हा जिवंत झाल्याचा भास होत होता. सुरक्षेच्या दृष्टीने सातारा पालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकांनी मशाल हाताळताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले. शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला.

स्वराज्याची राजधानी राहिलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर पुन्हा एकदा तेजाचा दीप प्रज्वलित करून सातारा पालिकेने शिवप्रेमींसाठी संस्मरणीय क्षण निर्माण केला. अजिंक्यतारा किल्ल्यावरील या मशाल महोत्सवाने शिवजंयतीचा उत्सव ऐतिहासिक आणि दैदिप्यमान पद्धतीने साजरा होत असल्याचा संदेश दिला. स्वराज्याच्या तेजाची ही मशाल आगामी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news