Satara News : सातार्यात हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रे
आदेश खताळ
सातारा : सातारा नगरपालिका आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार्या ‘लोकलायझिंग प्लास्टिक अॅक्शन थ्रू कम्युनिटीज’ प्रकल्पांतर्गत सातार्यात पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. सातार्यात चार ठिकाणी ‘हवा गुणवत्ता तपासणी उपकरणे’ बसवण्यात आली आहेत. या उपकरणांमुळे सातार्यातील हवेतील प्रदूषणाच्या स्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.
सातार्यातील प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणीय सुधारणेसाठी ही उपकरणे नगरपालिका मुख्य कार्यालय, पारंगे चौक, शाहूपुरी ग्रामपंचायत कार्यालय, सदर बाजार येथे बसवण्यात आली आहेत. त्यांची उंची 10 ते 12 फूट असून, ही उपकरणे पीएम 2.5. व पीएम 10, तापमान आणि आर्द्रता यासारख्या प्रदूषणविषयक घटकांचे सातत्याने निरीक्षण करतात. या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात सातार्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये उपकरणांमधून मिळणारा डेटा कसा गोळा करायचा, त्याचे विश्लेषण कसे करायचे आणि स्थानिक निर्णयप्रक्रियेत त्याचा कसा उपयोग करता येईल, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सध्या ‘लोकलायझिंग प्लास्टिक अॅक्शन थ्रू कम्युनिटीज’ हे राज्यातील पर्यावरणीय कृती संदर्भातील आदर्श मॉडेल ठरत असून सातारा शहरात त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. हे उपकरण शहराच्या पर्यावरण सुधारासाठी एक विश्वासार्ह आधार बनेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

