

कराड : जिल्ह्यासह राज्यातील सरासरी उत्पन्नापेक्षा काही पिकांचे कराड तालुक्यातील उत्पन्न जास्त आहे. त्यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणार्या शेतकर्यांसह अन्य शेतकर्यांना यापासून प्रोत्साहन मिळावे म्हणून कराड तालुक्यातील शेतकर्यांचा कृषी विभागाने स्वतंत्ररित्या दरवर्षी गौरव करावा, अशी सूचना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले आहे.
कराडच्या प्रशासकीय इमारतीत खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यासह आमदार मनोज घोरपडे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तालुका कृषी अधिकारी खरात, महेश जाधव, सागर शिवदास यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी तालुका कृषी अधिकारी खरात यांनी खरीप हंगामाच्या नियोजित आढावा व कृषी विभागाकडून करण्यात येणारी उपाययोजना याची माहिती देण्यात आली. यावेळी दुर्दैवीरित्या अपघातात मयत झालेल्या शेतकर्यांच्या वारसांना शासन भरपाई मंजुरीचे आदेश दोन्ही आमदारांच्या हस्ते देण्यात आले. त्याचबरोबर शासनाकडून गौरवण्यात आलेले तालुक्यातील शेतकरी तसेच विविध पिकांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आदर्श निर्माण करणार्या शेतकर्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, तालुक्यातील कराड, सैदापूर, उंब्रज आणि उंडाळे येथे कृषी विभागाची कार्यालय आहेत. कृष्णाकाठच्या गावात कृषी विभागाचे कार्यालय असणे काळाची गरज आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशी सूचना करत त्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. शेतकर्यांनी सेंद्रिय शेती आणि ठिबक सिंचन ला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पाणी व रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर कसा घातक आहे ? याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.