

सातारा : सातारा जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायती निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यातच आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धुमशान सुरू होणार आहे. शहरातील पालिका निवडणुकांच्या गुलालाचा धुरळा आता बसला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना झेडपी निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी गाठीभेटीवर जोर दिला आहे.
जिल्ह्यातील 9 नगरपालिका व एका नगरपंचायतीची निवडणूक पार पडली. रविवार दि. 21 रोजी मतमोजणीही झाली. यातच निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. त्यादरम्यानच झेडपीचे धुमशान रंगण्याची चिन्हे आहेत. सातारा जिल्ह्यात झेडपीचे 65 गट व पंचायत समितीचे 130 गण आहेत.
येत्या दोन-चार दिवसांत या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक तारीख जाहीर होण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्वांचे लक्ष या आगामी निवडणुकांकडे लागले आहे. जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला झोपवत महायुतीने ठिकठिकाणी सरशी मारली आहे. याच्यात भाजप थोरला भाऊ राहिला आहे.
झेडपी व पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार व नेते गाठीभेटीवर भर देत आहेत. नगरपालिका निवडणुका संपल्याने हे शहरातील वारे ग्रामीण भागात जाणार आहे. ग्रामीण भागातील गावागावात आणि चौकात आपल्या जिल्हा परिषद गटाचा व पंचायत समिती गणाचा कोण उमेदवार असणार याबाबत चर्चा रंगत आहेत.
निवडणुका आल्यामुळे अनेकांना साक्षात्कार
झेडपीची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी ग्रामीण भागातील उतावीळ कार्यकर्ते जोषात आहेत. गावागावात कुरघोडीचे अंतर्गत डावपेच आखले जात आहेत. इच्छुकांना लोकसंपर्क, विकास, प्रबोधन व जनतेच्या हिताचा साक्षात्कार झाला आहे. निवडणूक लागताना राजकारणातील हे फंडे आता सर्वांनाच परिचित झाले आहेत. मात्र, जनता काही फारशी जागृत झाली आहे असे वाटत नाही. मतदानावेळी ऐन निवडणुकीत तयार झालेल्या वातावरणाने प्रभावित होऊन मतदान केले जात असल्याचे दिसून येते. वास्तविक कायम जनतेत राहणार्या, त्यांच्या अडीअडचणीला व मदतीला धावून जाणार्या तसेच विकासासाठी धडपडणार्या कार्यकर्त्यांना झेडपी व पंचायत समितीला संधी मिळण्याची गरज व्यक्त होत आहे.