

सागर गुजर
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा तसेच एटीएम मशिनच आता चोरीचा प्रयत्न हाणून पाडणार आहेत. दरोडा किंवा चोरीच्या उद्देशाने चोरटे जर बँकेत किंवा एटीएममध्ये गेले तर पोलिस येतील, निघा इथून अशी सूचनाच एटीएम देते. त्यातूनही चोरट्यांनी मुजोरी केली तर अवघ्या काही सेकंदांत पोलिस, अग्निशामक दल, ॲम्ब्युलन्स, शाखा सेवक मुख्यालय, गावातील नागरिक व इतर यांना अलर्ट केले जाते. अत्याधुनिक अशा ई-सर्व्हिलियन्स सिस्टिम यंत्रणेमुळे बँकेच्या शाखा व एटीएम सुरक्षित झाले आहेत.
जिल्हा बँकेने सुरक्षिततेच्या सर्व आधुनिक यंत्रणा बसवल्या आहेत. ज्या शाखा किंवा एटीएम मशिन असुरक्षित म्हणून निश्चित केले आहेत. त्या ठिकाणी सभासदांच्या ठेवींबाबत जास्तीत जास्त काळजी घेतलेली आहे. बँकेने असुरक्षित वाटणाऱ्या 64 शाखा आणि 64 एटीएमसाठी ॲमेझॉन ऑटोमेशन सिस्टिम्स या कंपनीने बसवलेली आहे. ई-सर्व्हिलन्स सिस्टीमसाठी अत्याधुनिक आयपी कॅमेरा यंत्रणा सिक्युरिटी अलार्म सिस्टीम आणि टू वे कम्युनिकेशन यांचा वापर केलेला आहे.
आयपी कॅमेरा यंत्रणेमध्ये इनडोअर आणि ऑर्डर कॅमेरे तसेच मेमरी कार्डस आणि यासाठी एनव्हीआर बसवलेले आहेत. सिक्युरिटी अलार्म सिस्टीममध्ये सायरन सिस्टीम दहा नंबरसाठी मेसेजेस यंत्रणा बसवलेले आहे. यावेळी कुठलाही दरवाजा वायरिंग काच किंवा इतर गोष्टींना धोका पोहोचवल्यास सायरन वाजतो तसेच महत्त्वाच्या नंबर्सला नाव मेसेजेस जातात आणि फोन डायलिंग केले जाते.
या यंत्रणेची विशेष बाब सांगताना बँकेचे उपव्यवस्थापक जयवंत पवार म्हणाले की, यामध्ये टू वे कम्युनिकेशनची सोय असून याद्वारे या व्यक्तींना प्रत्यक्ष बोलून सूचना दिल्या जातात. एटीएममध्ये मास्क, हेल्मेट, ओव्हर क्राऊडिंग याबाबत सूचना दिल्या जातात. कमेंट सेंटरमधून सर्व शाखा व कार्यालयांवर निगराणी केली जाते व योग्य त्या यंत्रणांना सूचना दिल्या जातात. उदाहरणार्थ पोलीस, अग्निशामक दल, ॲम्ब्युलन्स, शाखा सेवक मुख्यालय, गावातील नागरिक व इतर यांना अलर्ट केले जाते. सर्व यंत्रणांना बॅटरी बॅकअपद्वारे लाईट नसतानाही सप्लाय पुरवला जातो. या आधुनिक यंत्रणेमुळे चोरीच्या प्रकारावर नियंत्रण आणण्यात जिल्हा बँक यशस्वी झाली आहे.