

मसूर : कराड तालुक्यातील शामगाव येथे घरामध्येच रिफाइंड पामतेल, अज्ञात पांढरी पावडर व इतर रसायनांच्या मिश्रणातून बनावट दूध तयार करून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत उघडकीस आला. रविवारी (दि. २६) सायंकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वाती महेश फाटक (वय ३८) व महेश यशवंत फाटक ( ४४) या दोघांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत मसूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सातारा येथील अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त तुषार शिंगाडे, अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर, इमरान हवालदार व अल्पना गायकवाड यांनी मसूर पोलिसांच्या मदतीने शामगाव येथील ओंकनाथ मंदिरामागील यशवंत फाटक यांच्या घरावर छापा टाकला. कारवाईत मसूर पोलिस ठाण्याचे अतिरिक्त सपोनि पंकज पवार, सपोनि आदिनाथ खरात, उपनिरीक्षक सुधाकर भोसले आदी सहभागी होते.
छाप्यात ३ लिटर व २ लिटर म्हशीचे दूध, भेसळीचे मिश्रण, रिफाइंड पामतेल, अज्ञात पांढरी पावडर, लिक्विड, मिक्सर व हँड ब्लेंडर असा सुमारे ६,१९९ किमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक तपासात गाईच्या दुधात विविध पदार्थ मिसळून कृत्रिम दूध तयार करून ते म्हशीचे दूध म्हणून डेअरी व ग्राहकांना विकले जात असल्याचा संशय आहे. जप्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असून, अहवालानंतर आणखी गंभीर कलमे लागू होण्याची शक्यता आहे.