Satara ZP
Satara ZP Pudhari

‌Yashni Nagarajan: ‘प्रशासक‌’असूनही अध्यक्षपदासारखी कामगिरी

याशनी नागराजन यांचे दुर्गम गावांसाठी पुढारपण : वाडी-वस्तीवर पोहोचवला निधी
Published on

सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सातारा जिल्ह्यातील दुर्गम गावासाठी पुढारपण करून दुर्लक्षित गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रशासक असूनही त्यांनी अध्यक्षपदासारखी कामगिरी करुन दाखवली. जिल्ह्यातील वाडी वस्तीवर निधी पोहोचवून गावांचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. डॅशिंग अधिकारी म्हणून प्रशासनात चांगली ओळख निर्माण केली. गावोगावी भेटींच्या माध्यमातून महिला व नागरिकांच्या समस्या ऐकून घेवून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत 20 मार्च 2022 ला संपली आहे. तेव्हापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राजवट सुरू आहे. आतापर्यंत विनय गौडा, ़ज्ञानेश्वर खिलारी यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. सध्या याशनी नागराजन प्रशासक पदाची धुरा संभाळत आहेत. तसेच 11 पंचायत समित्यांमध्येही गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पहात आहेत. सातारा जिल्हा परिषदेमधील प्रशासक राजवटीला सुमारे 4 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे.

जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी नेहमीच दुर्गम व छोट्या गावांना, वाड्या वस्त्यांना निधी देण्यात हात आखडता घेत असतात. कारण त्या गावाचे, वाडीचे मतदान किती झाले याची शहनिशा करत असतात. त्यानुसारच त्या गावांना निधी दिला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या वस्त्या विकास निधीपासून दुर्लक्षित राहिली आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी प्रशासकपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर कामाचा झपाटा सुरू केला.

सातारा जिल्ह्यातील दुर्गम व डोंगरी भागात यापुर्वीचे अधिकारी व कर्मचारी ज्या ज्या ठिकाणी गेली नाहीत त्या-त्या ठिकाणी याशनी नागराजन यांनी भेटी देवून तेथील परिस्थिती जाणून घेतली. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांशी संवाद साधला. त्या ठिकाणी काही अडीअडचणी आहेत त्याची माहिती घेतली. भेटीवेळी दिलेले आश्वासनाची पुर्तता करत दुर्गम व डोंगरी भागातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या कार्यकाळात सातारा जिल्हा परिषदेने पारदर्शक आणि गतिमान प्रशासनासाठी राज्यासह देशभरात नावलौकिक मिळवला आहे.

याशनी नागराजन यांच्या नेतृत्वाखाली शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतींना भेटी देवून त्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळेच सातारा जिल्ह्याची प्रशासकीय शिस्त आणि विविध स्पर्धामध्ये कामगिरी उंचावली आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत रस्ते, आरोग्य शिक्षण आणि ग्रामीण विकास कामांना गती मिळाली आहे. राज्य शासनाच्या 150 दिवसाच्या कार्यालयीन सेवाविषयक बाबींमध्ये पारदर्शक, गतीमान सुप्रशासनाची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामकाज केल्याने सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात डंका वाजला आहे.

सीईओ नागराजन यांनी पुढाकार घेत महिलांचे कर्करोग निदान व वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात मिशन तेजस्विनी उपक्रम राबवला. महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध होण्यासाठी पाझर तलाव मत्स्य व्यवसायासाठी महिला बचत गटांना चालवण्यास दिले आहेत. त्यासाठी त्यांना मत्स्यबीजही पुरवण्यात आले. गर्भवती मातांची नियमित तपासणी सुरू केल्याने बालमृत्यूत घट झाली. याचबरोबर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल, मॉडेल पीएसी, मॉडेल अंगणवाड्यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरू लागले आहेत.

याशनी नागराजन यांनी आपल्या कामाची वेगळी ओळख जिल्ह्यात व राज्यात निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या कामातून कार्याचा ठसा उमटवला आहे. मिनीमंत्रालयात कामासाठी आलेल्या नागरिकांचे कोणतेही काम असले तरी त्या तात्काळ मार्गी लावत असल्याने त्यांंच्याकडे डॅशिंग लेडी अधिकारी म्हणून पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news