Koyna Dam: पाणीबाणीतही कोयना धरणाला प्रशासकीय ‘पाझर’

सिंचनासाठी कोयना धरण पायथा वीजगृहातून १,०५० क्युसेक पाणी सोडले
Koyna Dam
Koyna DamPudhari
Published on
Updated on
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : कोयना धरणात अपेक्षित पाणीसाठा शिल्लक असला तरी यावर्षी हवामान खात्याने वर्तवलेला कमी पावसाचा अंदाज व अल निनोचा धोका या पार्श्वभूमीवर सिंचन व वीजनिर्मितीच्या पाण्याला प्रचंड निर्बंध व मर्यादा आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बंद केलेल्या सिंचनाच्या पाण्यामुळे पाटण, कराड ते सांगलीपर्यंत कोयना व कृष्णा काठच्या गावांचे पाण्याचे हाल झाले. नदीपात्रं पूर्णपणे कोरडी पडली असतानाच कोयना धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १,०५० क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

सध्या धरणातील पाणीसाठा हा एका बाजूला समाधानकारक तर दुसरीकडे चिंता व चिंतनाचा विषय बनला आहे. याच काळात सिंचन व वीजनिर्मितीला कमालीचे निर्बंध आल्याने त्याचे चटके देखील सगळ्या पातळीवर बसत आहेत.अशा काळात पाण्याची कमालीची काटकसर गरजेची आहे. एक जूनपासून सुरु झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक जलवर्षक सध्या अपेक्षित म्हणजे उपलब्ध १५.७० पैकी उपयुक्त १०.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरण पायथा वीज गृहातील दोन्ही जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून भलेही कोयना नदीपात्रात सिंचनासाठी पाणी सोडले तरी दरमहा एकूण ५ टीएमसी पाण्याचा वापर होतो.

सध्याचे शिल्लक पाणी लक्षात घेता जवळपास अद्यापही दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे, मात्र तरीही वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय निर्बंध लक्षात घेता मागील काही दिवसांपासून वीजनिर्मिती तर दूरच परंतु सिंचनासाठी सोडण्यात आलेली पाणीही पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. बुधवारपासून पायथा वीज गृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून करून पाणी सोडण्यात आल्याने पश्चिम महाराष्ट्रासाठी हा काहीसा दिलासा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news