

सातारा : ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन व परिसर सुशोभीकरणासाठी १३४.८० कोटी आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे संवर्धन, जीर्णोद्धार तसेच परिसर विकसित करण्याच्या १३२.९५ कोटींच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही दोन्ही कामे वेगाने व दर्जेदार करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात शिवेंद्रराजे यांनी बैठक घेऊन अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन व संवर्धन, परिसर सुशोभीकरण आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि परिसर विकसित करण्याच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, अक्षय जाधव, फिरोज पठाण, सचिन कांबळे, कन्हैयालाल राजपुरोहित, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विश्वास सातपुते, पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, श्रीराम कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शिवेंद्रराजे म्हणाले, अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन-संवर्धन आणि संगम माहुली येथील विकासकामांच्या बांधकाम कामांची निविदा एकत्रित काढावी. अजिंक्यतारा किल्ला संवर्धन कामात विविध ठिकाणी पायवाटा तयार करण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी किल्ल्यावर वन्य प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे प्रकाश केवळ पायवाटांवर पडेल अशा स्वरूपाचे दिवे बसवावेत. संवर्धनाच्या कामातून निधी शिल्लक राहिल्यास खिंडीतील गणपती मंदिरापासून अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट तयार करावी. या कामांच्या संदर्भाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अजिंक्यतारा किल्ल्याची पाहणी करावी.