

महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरला कुणी रुग्णवाहिका देता का रुग्णवाहिका’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली. ना. आबिटकर यांनी तातडीने महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयातील 108 रुग्णवाहिकेची दुरुस्ती करण्याचे फर्मान काढले. यानंतर एका रात्रीत रुग्णवाहिकेची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. आता ही रुग्णवाहिका पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज झाली आहे.
दरम्यान, महाबळेश्वरसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी केवळ एकाच रुग्णवाहिकेवर अवलंबून राहणे धोकादायक असून, आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी किमान आणखी दोन अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयातील 108 रुग्णवाहिकेच्या सेवेबाबत ‘पुढारी’ने रोखठोक भूमिका मांडत वास्तव परिस्थिती समोर आणली होती. ढकलस्टार्टने सुरू होणारी रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाईकांना व कधी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच ‘दे धक्का’ मारावा लागणारी विदारक अवस्था, याचे सचित्र वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. आपत्कालीन सेवेचे ‘रुग्णांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद जणू फक्त कागदावरच उरले असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते.
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, या उद्देशाने शासनाने ‘108’ रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती. कृत्रिम श्वसन यंत्रणा, औषधे, शॉक मशिन, ऑक्सिजन सिलिंडर व डॉक्टरांसह सज्ज रुग्णवाहिका अवघ्या एका कॉलवर उपलब्ध होईल, अशी या सेवेची ओळख होती. मात्र महाबळेश्वर तालुक्यात या सेवेचा बट्ट्याबोळ उडाल्याचे वास्तव ‘पुढारी’ने समोर आणले. या वृत्ताची दखल थेट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली. यानंतर तातडीने फोन फिरवत रुग्णवाहिकेची दुरुस्ती करून रुग्णसेवेत दाखल करावी, अशी सूचना केली. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. मंत्र्यांनीच फर्मान काढल्याने एका रात्रीत रुग्णवाहिका दुरुस्त करण्यात आली.
दरम्यान, महाबळेश्वर येथील 108 टोल रुग्णवाहिकेवर कागदोपत्री दोन डॉक्टरांची नियुक्ती असली, तरी प्रत्यक्षात सध्या केवळ एकच डॉक्टर उपलब्ध आहेत. तसेच महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळी किमान दोन अद्ययावत रुग्णवाहिका आणि पुरेशा डॉक्टरांची उपलब्धता अत्यावश्यक आहे. यासाठीही शासनस्तरावर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.