

कोरेगाव : खटाव तालुक्यातील अवैधरित्या वाळू उत्खननप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधीमंडळात दिली. याबाबत आ. शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.
खटाव तालुक्यात अवैधरित्या वाळू उत्खनन होत असून शासनाचा महसूल बुडत आहे. अधिकारी व पोलिसांच्या संगनमताने अवैधरित्या वाळूचे उत्खनन होत असून याबाबत काय कारवाई केली? असा प्रश्न आ. शशिकांत शिंदे यांनी केला. त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, खटाव तालुक्यात स्थानिक तलाठी, प्रांत, तहसिलदार व स्थानिक पोलिसांच्या संगनमताने अवैध वाळू उत्खनन होत असल्याची बाब खरी नाही. मात्र, तेथील अवैध वाळू उत्खननाबाबतच्या भ्रमणध्वनीद्वारे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने खटावच्या तहसीलदारांनी स्थळ पाहणी व पंचनामे करुन पाच व्यक्तींना नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना त्यांचे म्हणणे सादर करण्याची संधी देऊन त्यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाई केली असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, मागील काळात पाणी पुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. राज्यस्तरावर निकृष्ट दर्जाच्या पाईपलाइन्स मंजूर केल्या गेल्या. ग्रामपंचायत किंवा ग्रामविकास विभागाला परवानगी घेणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा विभागाच्या टेंडरमध्ये रस्ते खोदल्यानंतर ते पूर्ववत करण्यासाठी याची तरतूद आहे का? पूर्ण गाव विस्कटून टाकले जाते, तरी त्यासाठी निधी मिळत नाही. अंतर्गत रस्त्याला देखील पैसे नसल्याचेही आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.