

कराड : पुढारी वृत्तसेवा
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी कराड नगरपालिका परिसरात कारवाई करत नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यास पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, कराड नगरपालिकेचे सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तोफिक शेख यांच्यासह अजिंक्य देव या खासगी व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग लाचलुचपत विभागाच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाला आहे.
कराडचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह नगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे, बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफिक शेख आणि खासगी व्यक्ती अजिंक्य अनिल देव या चौघा संशयितांच्या विरोधात कारवाई झाली आहे.
अजिंक्य देव या खासगी व्यक्तीच्या सांगण्यावरून 5 लाख स्वीकारताना कराड नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तोफिक कय्यूम शेख हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सोमवारी सायंकाळी अडकले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू होती.
कराडच्या सोमवार पेठेतील एका इमारतीस सुधारित बांधकाम परवाना देण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पाच लाख रुपये स्वीकारताना बांधकाम विभागातील कनिष्ठ कर्मचारी तोफिक शेख रंगेहात लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. चार दिवसापूर्वी म्हणजेच 20 मार्चला मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची कराड नगरपालिकेतून बदली झाली आहे.
चार दिवसापूर्वी बदली झाल्यानंतरही मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी इमारतीच्या सुधारित बांधकाम परवानगीसाठी खासगी व्यक्ती अजिंक्य देव यांच्याकडून प्राप्त झालेल्या फाईलवरून संशयित सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे आणि बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तोफिक शेख यांच्या मदतीने सुधारित बांधकाम परवानगीस आवश्यक चलन स्वतःच्या व्हाट्स अप नंबरवर घेतले. हे चलन शंकर खंदारे यांना सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे यांच्या मोबाईलवरून पाठविण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.
विशेष म्हणजे त्यानंतर मागील तारखेच्या चलनावर स्वाक्षरी करून मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी ते पुन्हा संशयित सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे यांच्या व्हाट्स ॲप नंबरवर पाठविल्याचा दावा लाचलुचपत विभागाने केला आहे. इमारतीच्या सुधारित बांधकाम परवानगी मिळाल्याने तक्रारदार यांना सुमारे 2 हजार वाढीव एफएसआय मिळणार होता आणि त्यांची बाजार भावाप्रमाणे सुमारे 80 लाख किंमत होणार असे सांगत तक्रारदाराकडे लाच मागण्यात आली होती. यापैकी पाच लाख स्वीकारताना नगरपालिका कर्मचारी तौफिक शेख रंगेहात सापडले आहेत. त्यामुळे शंकर खंदारे यांनी पदाचा गैरवापर करत लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा दावा लाचलुचपत विभागाने केला आहे.