

सातारा : विनातिकीट प्रवास करणार्याविरोधात एसटी महामंडळ सतर्क झाले आहे. आता फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. वर्षभरात सुमारे 6 भरारी पथकांमार्फत बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 169 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 37 हजार 878 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्या एसटीने विविध सवलत योजना आणल्या आहेत. शासनाने 75 वर्षांच्या पुढील नागरिकांना मोफत एसटी प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना 50 टक्के तिकिटामध्ये सवलत देणारी महिला सन्मान योजना सुरु केली. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. महिला सन्मान योजनेमुळे महिलांसोबत पुरुषांची प्रवासी संख्या वाढली आहे. वाट पाहीन पण एसटीनेच जाईन हे ब्रीदवाक्य जरी प्रचलीत असले तरी हे ब्रीदवाक्य प्रवास करताना पाळले जाते. मात्र प्रवास करताना तिकिट न काढणारे प्रवासी देखील काही कमी नाहीत.
फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी महामंडळाच्या सातारा विभागाने सहा भरारी पथकांमार्फत वर्षभरात विविध मार्गावर एसटी बसेसची तपासणी करण्यात आली. 169 फुकटचा प्रवास करणार्या प्रवाशांना एसटीच्या तिकीट तपासणीमार्फत पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून 37 हजार 878 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांना तिकिटाच्या दुप्पट रक्कम किंवा 100 रुपये यापैकी जी मोठी रक्कम असेल ती रक्कम प्रवाशांना भरावी लागते. त्यामुळे दंडाची दुप्पट रक्कम भरण्यापेक्षा तिकीट काढून प्रवास करावा. मात्र कमी अंतराच्या प्रवासात अनेक प्रवाशी गर्दीच्यावेळी वाहकांना चकवा देतात.