

सातारा : सातारा पालिका निवडणूक भाजपमधून लढवण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र मोजक्या जागा असल्यामुळे सर्वांना संधी देणे शक्य नव्हते. पक्षातून अपक्ष अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज काढून घेऊन भाजपच्या अधिकृत उमेदवारांना साथ द्यावी, अन्यथा पक्षांतर्गत कारवाई करणार, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, भाजपचे निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम, सुनील काटकर, दत्ताजी थोरात, विठ्ठल बलशेटवार, अमोल मोहिते प्रमुख उपस्थित होते. ना. शिवेंद्रराजे म्हणाले, आरपीआयला एक जागा देण्यात आली असून जिल्ह्यात आरपीआयने भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर नगराध्यक्षासह सर्व जागा जिंकू.
बंडखोरांवर पक्ष काय कारवाई करणार? असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, बंडखोर परत सोबत आले आणि त्यांनी पक्षसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर विचार केला जाईल. भावना व्यक्त करण्यासाठी कधी विरोधात अर्ज भरले जातात. पक्षातील अपक्ष उमेदवार हे पक्षाला मान देऊन थांबतील. भाजप अधिकृत उमेदवारांविरोधात लढणाऱ्या पक्षातील अपक्षांवर पक्षांतर्गत निश्चित कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
युतीतील इतर मित्र पक्षांचे आव्हान समोर आहे. पालकमंत्र्यांनी काही जागांवर उमेदवार दिले आहेत याबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, ज्यांनी आमच्यासोबत चर्चा केली ते सोबत आहेत. चर्चा न करता बाकीच्यांना सोबत घेणार कसं? निरोप, चर्चा किंवा बैठकीबद्दल न विचारता त्यांनी वेगळी भूमिका घेतली. युतीमध्ये सेना असतानाही सेनेने वेगळे अर्ज भरले आहेत. आमच्यासोबत जे आले त्यांना बरोबर घेतले. त्यांना पुढे घेऊन जाऊ. जिल्ह्यात भाजप वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी जावलीत येऊन कार्यक्रम घेतले म्हणून आमची त्यांना हरकत नव्हती. पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.
भाजप सत्तेत असल्यामुळे सातारकरांसाठी सुवर्णसंधी आहे. भाजपला सर्वांनी साथ द्यावी. सर्व जागा निवडून आणण्यासाठी ताकद लावणार आहे. बऱ्याचदा ताकदीच्या उमेदवारांबद्दल बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होतो. मतदारांनी न भुलता मुद्द्यांवर लक्ष ठेवावे. महाबळेश्वर व पाचगणीमध्ये आघाड्यांसोबत भाजपने युती केली आहे. भाजप उर्वरित सर्व पालिकांमध्ये स्वबळावर लढत असल्याचे ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मविआत सुवर्णा पाटील यांना न्याय मिळणार नाही
सुवर्णा पाटील यांनी अचानक भाजप सोडून मविआतून उमेदवारी दिली, याबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, त्यांनी यापूर्वी भाजपमधून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. त्यांना संधी न मिळाल्यामुळे त्या नाराज झाल्या. मविआत त्यांना न्याय मिळणार नाही. आघाडीला उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांना भाजपमधील उमेदवार घ्यावा लागला. त्यामुळे ही आघाडी फेल झाली आहे. त्यामुळे सुवर्णा पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा. त्यांनी पक्षासोबत रहावे, अशी इच्छा आहे.