कराड : उंडाळे ते शेडगेवाडी रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. भरधाव वेगामुळे अनेकांना जीवास मुकावे लागले आहे. या मार्गावर अपघाताचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत वीसहून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा मार्ग अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे.
कराडपासून रत्नागिरीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून पाचवड ते शेडगेवाडी मार्गाचा वापर केला जातो. तीन वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. रस्ता सुस्थितीत असल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. रस्त्याला साईडपट्ट्या नसल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. या मार्गावरून धावणार्या वाहनांपैकी दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. या दुचाकी सुसाट असतात. त्यामुळे अपघात घडत आहेत.
रयत सहकारी साखर कारखाना, य.मो.कृष्णा कारखाना, निनाईदेवी साखर कारखाना, दालमिया कारखाना या कारखान्यांची ऊस वाहतूक या मार्गावरून सुरू असते. ऊस वाहतूक ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी यांची वाहतूक या मार्गावर असते. काही वेळा ऊस वाहतूक करणारी वाहने नादुरुस्त होतात. ती रस्त्याकडेला उभी असतात. रात्रीच्यावेळी या वाहनांना धडकून दुचाकीस्वार जखमी होतात. काहींना तर जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावर पाचवड फाटा, धोंडेवाडी फाटा, नांदगाव, ओंड, या ठिकाणी चौक आहेत. त्यामुळे वाहनांची व नागरिकांची येथे मोठी वर्दळ या ठिकाणी असते. वाहने सुसाट असल्याने अपघात घडतात. या मार्गावर गर्दीच्या ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्याची मागणी होत आहे.