

सातारा : मूळचे कोरेगाव तालुक्यातील असलेल्या दोघा हॉटेल व्यावसायिकांनी थायलंड या देशात जर्मन पर्यटक युवतीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तेथील पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विजय दादासाहेब घोरपडे व राहुल बाळासाहेब भोईटे (दोघे मूळ रा. चिलेवाडी व तडवळे, ता. कोरेगाव, जि.सातारा) अशी त्यांची नावे आहेत. थायलंडमधील सुरत थानी प्रांतामध्ये ही घटना घडली. ‘पूर्ण चंद्र दिसणार्या पार्टी’साठी (फुल मून नाईट) पीडित तरुणी पर्यटक म्हणून तेथे गेली होती. त्यावेळी संशयितांनी पीडित युवतीवर हल्ला करून जखमीही केल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही घटना दि. 14 मार्च रोजी घडली आहे. या घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून संबंधितांनी सातासमुद्रापार केलेले कांड संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया समाजमनातून उमटत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, जर्मन येथील म्युनिक या प्रांतातील 24 वर्षीय पर्यटक युवतीने 14 मार्च रोजी थायलंड येथील हाड रीन पोलिस ठाण्याला याबाबतची तक्रार केली आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, कोह फांगन बेटावर दोन भारतीय पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर कोह फांगन या बेटावरील बान ताई उप-जिल्हा मधील पॅराडाईज बंगल्याजवळील खडकाळ असलेल्या मैदानाजवळ तिच्यावर हल्लाही करण्यात आला. या हल्ल्यानंतर संशयित दोघे घटनास्थळावरून पळून गेले.
पीडित युवतीने पोलिसांना सांगितले की, ती पूर्ण चंद्र दिसणार्या पार्टीत (फुल नाईट मून) सहभागी होण्यासाठी बेटावर गेली होती. तिचे वास्तव्य कोह समुई येथील बो फुट येथील एका हॉटेलमध्ये होते. मात्र अत्याचारासारख्या घटनेला तिला सामोरे जावे लागले. या युवतीने थायलंड पोलिसांकडे दोन भारतीय पुरुषांबाबतची तक्रार दिल्यानंतर थायलंडमधील कोह फांगन पोलिस स्टेशनचे अधीक्षक, पोलिस कर्नल अपिचट चान्सुमरेट यांनी तातडीने कनिष्ठ पोलिस अधिकार्यांना पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले. गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोलिसांचे एक पथक पाठवले. त्या पथकामध्ये फॉरेन्सिक तज्ञ होते. या पथकाने घटना घडलेल्या परिसरातून पुरावे गोळा केले.
बलात्कार प्रकरणी संशयितांचा शोध घेण्यासाठी कोह फांगन पोलिस, रीजन 8 इन्व्हेस्टिगेशन पोलिस, टुरिस्ट पोलिस आणि इमिग्रेशन पोलिस यांच्या संयुक्त प्रयत्नातून तपासाला सुरुवात करण्यात आली. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन संशयित व्यक्तींची ओळख पटली. त्याआधारे तसेच पीडित युवतीने दिलेल्या संशयितांच्या वर्णनानुसार शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी संशयितांच्या हालचालींचा तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना त्यांना माहिती मिळाली की दोन्ही संशयित आरोपी हे थायलंडमधील कोह फांगन उपजिल्हा, मू 1 येथील एका बंगल्यात राहत आहेत. त्यानुसार थायलंड पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आणि दोघांना कोह फांगन पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी आणले. दोघांना त्यांची नावे विजय व राहुल असे भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले. ते दोघेही पर्यटक व्हिसावर थायलंडमध्यश प्रवासकरत होते.
पोलिस तपासाचा पुढील टप्पा म्हणून थायलंड पोलिसांनी दोन्ही संशयितांचे डीएनए नमुने घेतले आणि ते चाचणीसाठी कोह फांगन रुग्णालयात पाठवले. अधिकृत आरोप दाखल करण्याआधी आणि खटला पुढे नेण्यापूर्वी थायलंड पोलिस अधिकारी डीएनए चाचणीच्या निकालाची वाट पाहत आहेत.
कोह फांगन पोलिस ठाण्याचे अधीक्षक, पोलिस कर्नल अपिचट यांनी सांगितले की, थायलंडच्या पोलिस अधिकार्यांना खात्री आहे की, त्यांनी योग्य संशयितांना पकडले आहे. कारण घटनेवेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघेच कैद झालेले होते. मात्र, दोन्ही संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्या जबाबामध्ये तफावती आढळल्या आहेत. थायलंड पोलिसांच्या चौकशीमध्ये विजयने आरोप मान्य केले नाहीत तर राहुलने विसंगत विधाने केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.