

सातारा : सागर गुजर
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते सातारा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे पाठदुखी आाणि अन्य व्याधीबरोबरच वाहनांचेही नुकसान होत आहे. वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील बहुतांश गॅरेज वाहन दुरुस्तीसाठी फुल्ल झाली आहेत. तर आधीच महागाईने वैतागलेल्या नागरिकांना निष्कारण हा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
खड्ड्यांमुळे महामार्गावर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाऊस सुरू असल्याने खड्डे पाण्याने भरतात. त्यामुळे खड्ड्यांचा नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यात आदळून दुचाकीचे नुकसान होते. पावसाने काही काळ विश्रांती घेतली असल्याने महामार्ग प्राधिकरणाकडून खड्डे भरायला सुरुवात करायला हवी होती. मात्र, अजूनही हे काम सुरु झालेले पहायला मिळत नाही.
पूर्वी वयोमानापरत्वे सांध्यांची झीज होत असल्यामुळे उद्भवणार्या या व्याधीचे आता तरुणही बळी पडत आहेत. वजन वाढणे, खांदे, पाठ, कंबरदुखीसारख्या व्याधींनी डोके वर काढले आहे. पाठदुखीणे हैराण असलेल्या नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.
खड्ड्यांमध्ये वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. यामुळे गॅरेजवाल्यांना काम सरेना अन वाहनधारकांच्या खिशात पैसे उरेनात असे चित्र पहायला मिळते आहे. खड्ड्यात वाहने आदळल्याने महिन्यातून किमान एकदा वाहन गॅरेजमध्ये नेण्याची वेळ येत आहे.