

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहरलागत असलेल्या क्षेत्रमाहुली येथील दोघांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तडीपार करत दणका दिला. जयदीप सचिन धनवडे (वय 22), हर्षद संभाजी साळुंखे (वय 22, दोघे रा. क्षेत्रमाहुली ता. सातारा) अशी त्यांची नावे असून दोघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
धनवडे व साळुंखे या दोघांच्या टोळीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, चोरी करणे, खंडणी मागणे, दुखापत पोहोचवणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी अटकेची तसेच प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र गुन्हे करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. दोघेही सातारा शहर तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करत होते. कायद्याचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा शहर परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. या टोळीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत होती.
दोन्ही संशयितांचा पोनि राजेंद्र मस्के यांनी प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवला. हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर सुनावली झाली. त्यानुसार दोघांच्या टोळीला सातारा, पुणे, सोलापूर व सांगली जिल्ह्यांतील काही तालुक्यांमधून तडीपार करण्यात आले. संपूर्ण सातारा तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यांतून, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा तालुक्यांतून व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करण्यात आले आहे.
दरम्यान, नोव्हेंबर 2022 पासून वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाईनुसार 127 जणांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध हद्दपारी, मोका, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाई करण्यात येणार आहेत.