पुढारी ऑनलाईन डेस्क : अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणार्या आणि त्यांना मायेची सावली देणार्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर ठोसरपागा स्मशानभूमी येथे काल (दि.०५) बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अलोट गर्दीत साश्रुनयनांनी सिंधुताईंना अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान सिंधुताईंनी हजारो मुलांना घडवले आहे. याबाबत आपल्या आठवणी अनेकजण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सातारा पुढारीचे वृत्तसंपादक हरिष पाटणे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
पत्रकारितेची उमेदवारी करत होतो, तेव्हाची गोष्ट आहे. शिरवळ महाविद्यालयात FYB.A ला admission घेतले होते. वक्तृत्व स्पर्धा ही त्या काळात गाजवायचो. महाविद्यालयाने एका कार्यक्रमाला सिंधुताई सपकाळ यांना बोलावले होते, कार्यक्रमाचे निवेदन माझ्याकडेच होते. त्या दिवशी पहिल्यांदा माई ला ऐकले, काळीज चिरून गेले, वेदनांची मशाल घेऊन माई जगत होती, ती आभाळमाया बरसत होती.
'फुलांच्या पायघड्यावरून जायचे असेल तर काटे वेचावे लागतील बेटा. संघर्ष पाचवीला पुजलाय म्हणून लढायच सोडू नको', सर्व काही टिपून घेत होतो,डायरी त नोंदवत होतो. डोळ्यातली टीप गाळतच कार्यक्रम संपताना माई पुढे डायरी धरली.
माझ नाव विचारलं, बेटा छान बोलतोस रे म्हणत, हरिष, आभाळा एवढा मोठा होशील असे माई ने स्वतःच्या हाताने त्या डायरीत लिहिले. एवढा गलबलून गेलो की मला ते आभाळच ठेंगणं वाटू लागलं.
त्या आभाळमायेचा आशीर्वाद घेऊनच साताऱ्यात आलो. पुढचा संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने पाहिला आहे. पुढारी त कस्तुरी क्लबची नुकतीच स्थापना झाली होती. तेव्हा एका कार्यक्रमाला माईला बोलवायची इच्छा झाली.
माईला शिरवळच्या त्या कार्यक्रमाची आठवण करून दिली आणि आता मी कोणत्या पदावर आहे हे सांगितले तेव्हा एवढी हरकून गेली ,माझे आशीर्वाद पावले रे लेकरा,नक्की येते म्हणाली.
१३ ऑक्टोबर २०१२ या दिवशी साताऱ्यात शाहू कलामंदिर खचा खच भरले होते. माई गाडीतून उतरली आणि माझे हात नकळत तिच्या पायांकडे गेले. झुकून नमस्कार केला. खरंच मोठा झालास की रे म्हणाली. त्या दिवशी सायंकाळी आईच्या काळजातून आभाळमाया पुन्हा बरसली. आख्ख शाहू कलमंदिर ढसा ढसा रडत होत.
सातारकरांनी ही तिच्या ओट्यात भरभरून दान दिले. भाषण संपल्यानंतर माई ने पुन्हा माईक हातात घेतला, पुढारीचे तिने कौतुक केले आणि माझ्याकडे पाहत माई म्हणाली, गरुडा सारखी नजर ठेव म्हणजे तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिम्मत होणार नाही! अनुभवातून आलेला माईचा तो उपदेश मी मनोमन लक्षात ठेवला तो आज पर्यंत. तेव्हा माझी लेक शर्वरी ही खूप लहान होती.
मी कुटुंबाची ओळख करून दिली तेव्हा माईने मायेने शरू ला जवळ घेतलं, तिच्या गालावरून हात फिरवला ,जो आशीर्वाद माई ने मला दिला होता तोच माझ्या लेकीला ही दिला आणि बघ तुला तेव्हा ही माझी आठवण येते की नाही असे म्हणून माई खळखळून हसली.
आज दिवसभर अस्वस्थ आहे. त्यात माई व शरूच्या फोटोने आभाळ पुन्हा उसवलय.!
माई तू आठवशील ठाई ठाई !!
____हरिष पाटणे, वृत्तसंपादक, पुढारी सातारा