

सातारा : अंबेदरे रोड, शाहूपुरी येथून चोरट्यांनी घरातून 9 लाख रुपये किमतीचे सुमारे 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आदित्य सुनील भोसले (वय 22, रा. आंबेदरे रोड, शाहूपुरी, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी आजीला दवाखान्यात घेऊन जायचे होते. त्यामुळे आदित्य यांच्या आजी व आईने कपाटामध्ये दागिने ठेवले होते. दि.31 ऑगस्ट रोजी गौरी, गणपती सण असल्यामुळे भोसले कुटुंबीयांनी कपाटात सोन्याचे दागिने पाहिले. यावेळी कपाटात दागिने नसल्याचे दिसून आले. घरामध्ये सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ते सापडले नाहीत. यामुळे चोरट्याने घरातून दागिन्यांची चोरी केल्याची त्यांची खात्री झाली.
चोरट्यांनी 2 लाख 30 हजारांचे 29 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 1 लाख 82 हजार रुपयांचे 26 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 98 हजारांचे 14 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, 35 हजारांची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 2 लाख 73 हजारांचे 39 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 49 हजारांची सोन्याची 7 ग्रॅम वजनाची कर्णफुले व वेल असा मुद्देमाल चोरून नेला.