मायबाप सरकार पाठीवर मारा, पोटावर नको | पुढारी

मायबाप सरकार पाठीवर मारा, पोटावर नको

तळमावले; नितीन कचरे : कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन वर्षांपासून गावच्या यात्रा बंद आहेत. या दोन वर्षांच्या कालावधीत यात्रांवर अवलंबून असणार्‍या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात्रांना व तमाशा कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी तमाशा कलावंतांनी केली आहे. ‘मायबाप सरकार पाठीवर मारा पण पोटावर मारु नका’, अशी आर्त हाक कलाकारांनी दिली आहे.

सद्यस्थितीत उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. गर्दीचे कार्यक्रम होत आहेत. पर्यटनस्थळे सुरू झाली आहेत. सर्व मंदिरे सुरू आहेत. आठवडी बाजार तसेच राजकीय सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तेव्हा कोणालाही कोरोनाची भीती नाही. मात्र, जेव्हा ग्रामीण भागातील यात्रांचा विषय येतो तेव्हा प्रशासनाला जाग येते आणि यात्रांमध्ये होणार्‍या कार्यक्रमांना बंदी घातली जाते. तेव्हा संबंधित प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणेने आठवडी बाजार ज्या नियम अटींवर सुरू केले आहेत त्या धर्तीवर तमाशा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

मार्च 2019 पासून हे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे ही लोककला लोप पावते काय असा धोका निर्माण झाला आहे. दीपावली पासून ग्रामीण भागातील यात्रा सुरू होतात. या यात्रांमधून लोककलांची जपणूक केली जाते. त्यामुळे प्रशासनाने या लोककलांना परवानगी देणे आवश्यक आहे. यात्रेमधील खेळण्याची दुकाने, मेवा मिठाईची दुकाने तसेच विविध व्यावसायिकांचा उदरनिर्वाह या यात्रांवर अवलंबून आहे. तसाच तमाशा कलाकारांचा उदरनिर्वाहही या यात्रांवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रशासनाने यात्रेतील होणार्‍या सर्व कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजकीय सभा, आठवडी बाजार यांमध्ये मोठ्या गर्दी होते त्यावेळी कोरोनाची भीती वाटत नाही मात्र लोककलेचा विषय आल्यानंतर दुजाभाव का केला जात आहे, असा संतप्त सवाल तमाशा कलावंतांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने लोकनाट्य तमाशांना परवानगी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कलावंतांनी दिला आहे.

ग्रामीण भागातील यात्रांवर ग्रामीण भागाची आर्थिक उलाढाल अवलंबून असते. तसेच यात्रांवर अवलंबून असणार्‍या तमाशा कलावंतांची उपासमार रोखायची असल्यास यात्रांमध्ये तमाशास परवानगी द्यावी अशी मागणी कलाकारांनी प्रशासनाकडे केली आहे.

ग्रामीण भागातील यात्रांमध्ये लोकनाट्य तमाशांना शासनाने परवानगी द्यावी. महाराष्ट्रातील लोककला लोप पावण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत लवकर निर्णय व्हावा.
– प्रभा गायकवाड
लावणीसम्राज्ञी

Back to top button