सातारा : अवकाळी आकाड; बळीराजाची आकडी | पुढारी

सातारा : अवकाळी आकाड; बळीराजाची आकडी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : ऋतुमानाचे चक्र पुरते बदलून गेले असून ऐन हिवाळ्यात पावसाळा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळलेल्या वातावरणात बुधवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पाऊस, ढगाळ हवामान, धुके आणि कडाक्याची थंडी अशा विचित्र वातावरणाचा जिल्हावासीयांना दिवसभर सामना करावा लागला. या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळी आकाडाने बळीराजाला अक्षरश: आकडी बसली आहे. दरम्यान, थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली असून थंड व दमट वातावरणामुळे सर्दी, खोकला तसेच सांधेदुखीसारखे आजार बळावले आहेत.

समुद्र किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे गेले तीन ते चार दिवस जिल्ह्यासह राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. बुधवारी पहाटेपासून सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. सातारा शहरात सकाळी 7.30 वा. पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर दुपारपर्यंत पावसाने उसंत दिली. मात्र, दुपारी 3.30 च्या सुमारास सातारा शहरात पुन्हा जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागले.

नागरिकांसह पथविक्रेत्यांची चांगलीच त्रेधा उडाली. भाजी विक्रेते व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची पळताभुई थोडी झाली. दिवसभर ढगाळ हवामान राहिल्याने हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. गार वारे आणि बोचरी थंडी यामुळे दिवसाही नागरिकांना हुडहुडी भरली होती. जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. सलग तीन दिवस ढगाळ हवामान राहिल्याने विशेषत: ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांना आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामध्ये सर्दी, खोकला व विषाणूजन्य आजाराच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. दमट हवामानामुळे सांधेदुखी, दमा, अस्थमा आदी आजार बळावले आहेत.

दरम्यान, वातावरण बदलाबरोबरच जिल्ह्याच्या तापमानाचा पारा उतरला होता. बुधवारी सातारा शहराचे तापमान 23 अंश तर थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरचे तापमान 19 अंश इतके निचांकी नोंदवण्यात आले.

शेती व्यवसायावर संकट…

सध्या रब्बी हंगामातील शेतीची कामे जोमात सुरु आहेत. मात्र गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यावर अवकाळीचे संकट घोंगावत आहे. पावसासह ढगाळ हवामान व धुके असा हवामानातील या विचित्र बदल पिकांवरील किडधाडीस पोषक आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर संकट ओढवले आहे.त्यावर मात करण्यासाठी बळीराजाने कंबर कसली आहे. बुधवारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

Back to top button