

सातारा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत भावी पिढी असलेली बालके सुदृढ व्हावीत, या उद्देशाने राबवण्यात येणार्या गेल्या वर्षभरात झालेल्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील 800 बालकांना जन्मजात हृदयरोग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील गरज असणार्या 110 बालकांवर मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. नात्यामधील लग्न, आनुवंशिकता किंवा आईला मधुमेहाचा त्रास असल्यास हा विकार उद्भवत असल्याचे 70 टक्के प्रकरणांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे गर्भावस्थेत होणार्या तपासणींकडे पालकांनी योग्य लक्ष देणे आवश्यक आहे.
लहान वयातच मुलांचे आजार समोर आल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार होऊन ते सुदृढ होण्यास मदत होते. याच भूमिकेतून केंद्र शासनाने मुला-मुलींच्या सर्वांगीण तपासणीसाठी आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास, शिक्षण विभाग व नगरविकास विभागाच्या समन्वयाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते. आरोग्य तपासणीमध्ये हृदयाच्या आजाराबरोबरच मुलांना कर्णबधिरतेचा आजार असल्याचे समोर आले. अशा पाच मुलांवर सातारा, पुणे व मिरज येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे या मुलांचा कर्णबधिरतेचा दोष निघण्यास मदत झाली आहे. त्याबरोबरच हर्निया, सुंता, जन्मतः असणारे व्यंग, अॅपेंडीक्स अशा विविध प्रकारच्या एक हजार 850 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात जन्मलेली तसेच उपचारासाठी येणार्या बालकांची तपासणी करण्यात येते.
जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मुला-मुलांची तपासणीही केली जाते. त्यामध्ये मुलांना असलेल्या विविध आजारांचा शोध घेतला जातो. त्यासाठी तपासण्या व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांचा सल्लाही घेतला जातो. यामध्ये शस्त्रक्रियेची आवश्यक असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित मुलांवर शासकीय तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल 2024 पासून जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरांमध्ये सुमारे तीन लाख 60 हजार बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या माध्यमातूनच मुलांना असणारे आजार समोर येण्यास मदत झाली आहे.