

पाटण : जगभरात प्रदूषण आणि पर्यावरणाच्या र्हासामुळे जागतिक तापमानात प्रचंड वाढ झाल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका अधिकाधिक वाढतच चालला आहे. चारही बाजूंनी पर्यावरणपूरक नैसर्गिक साधनसंपत्ती असताना कोयना धरणालाही ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सन 2016 ते 2025 या दहा वर्षात तब्बल 74.58 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.
नुकत्याच संपलेल्या धरणाच्या तांत्रिक जलवर्षात 7.76 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. देशासह राज्यातही पाण्याच्या एकेक थेंबासाठी झगडावे लागत असताना बाष्पीभवनाद्वारे वाया जाणार्या पाण्याबाबत शासन, प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असतानाही त्याबाबत वर्षानुवर्षे सकारात्मक अभ्यास व ठोस पावले उचलली जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाण्याचे दरवर्षी सरासरी सात ते आठ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. मागील दहा वर्षांत याद्वारे तब्बल 74.58 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. कोयना धरणांतर्गत शिवसागर कोयना ते तापोळा (महाबळेश्वर) अशा तब्बल साडेसदुसष्ट किलोमीटर अंतरावर हा जलाशय फार मोठ्या प्रमाणावर विखुरला गेला असला तरी इतर धरणांतील पाणी बाष्पीभवनाची तुलना केली तर कोयनेतील पाण्याचे त्यापटीत कमी बाष्पीभवन होत असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे.
धरणाच्या आजूबाजूला संपूर्णपणे पर्यावरणपूरक निसर्ग असून जंगले, वन संपदेमुळे धरणातंर्गत विभागात जमीनीची धुप कमी होत असल्याने बाष्पीभवन कमी होत असल्याचा दावा आहे. तब्बल 180 चौरस किलोमीटर अंतरावरील या परिसरात तापमान, वारा, सूर्यप्रकाश, हवेतील आर्द्रता याचाही परिणाम बाष्पीभवनावर होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
यावर्षी सर्वाधिक तापमान अनुभवायला मिळाले. त्यामुळे त्याच पटीत कोयना धरणातूनही बाष्पीभवन होण्याच्या शक्यता वर्तविण्यात आल्या होत्या. मात्र, धरणाच्या बाजूला असलेल्या जंगलांमुळे जमिनीची कमीत कमी होणारी धूप व पर्यावरणपूरक रक्षण यामुळे यावर्षी सरासरीच्या तुलनेत काहीसे कमी म्हणजेच 7.76 टीएमसी इतक्याच पाण्याचे बाष्पीभवन या जलवर्षात झाले आहे.