Khashaba Jadhav : पै. खाशाबा जाधव यांच्या ऑलिम्पिक पदकास 73 वर्ष पूर्ण

कराडच्या पट्ट्याने 1952 मध्ये स्वतंत्र भारताला जिंकून दिले पहिले ‘मेडल’
Khashaba Jadhav |
Khashaba Jadhav : पै. खाशाबा जाधव यांच्या ऑलिम्पिक पदकास 73 वर्ष पूर्णPudhari File Photo
Published on
Updated on

चंद्रजित पाटील

कराड : जगातील सर्वोच्च क्रीडा कुंभमेळा म्हणून ओळख असलेल्या ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतास पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा पराक्रम कराडच्या स्व. पै. खाशाबा जाधव यांनी आजच्याच दिवशी 73 वर्षांपूर्वी केला होता. याच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी 40 वर्षांपूर्वी जन्मगावी गोळेश्वरला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. दुर्दैवाने हे स्वप्न अनेक प्रयत्नानंतरही आजही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता तरी प्रशासन जागे होवून हे केंद्र उभारणार का असा प्रश्न क्रीडाप्रेमींतून उपस्थित होत आहे.

देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा पराक्रम मराठमोळ्या खाशाबा जाधव यांनी 23 जुलै 1952 रोजी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. स्व. खाशाबांच्या या पराक्रमाला आज तब्बल 73 वर्षे झाली आहेत. स्व. खाशाबांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदकासाठी तब्बल 44 वर्षे वाट पहावी लागली. त्यावरून खाशाबांनी मिळविलेल्या कांस्य पदकाचे महत्त्व खर्‍या अर्थाने अधोरेखित होते.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी आपले गुरू गोविंद नागेश पुरंदरे यांच्याकडे गोळेश्वरमध्ये नवोदित मल्लांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा आजही अपूर्णच आहे. विशेष म्हणजे गोळेश्वर ग्रामपंचायतीकडून प्रशिक्षण केंद्रासाठी 95 गुंठे जागा जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या नावावरही करून देण्यात आली आहे. मात्र त्यापैकी 58 गुंठे जागा गायब आहे. दोन वर्षीपूर्वी 14 ऑगस्टला तत्कालीन क्रीडा आयुक्तांनी कराडमध्ये बैठक घेत प्रशिक्षण केंद्राचा आराखडा सादर करावा, अशी सूचना करत निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले होते. तत्पूर्वी तब्बल 15 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर 1 कोटी 58 लाखातून केवळ राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या संरक्षक भिंतीचेच काम करण्यात आले आहे. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रणजीत जाधव हे आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने अहोरात्र झटत आहेत.

मागील सात ते आठ महिन्यांपासून आमदार अतुलबाबा भोसले यांनी या विषयात जातीने लक्ष घातले आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मागील वर्षी 25 ऑगस्टला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी 25 कोटी 75 लाखांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. मात्र जागेचा विषय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे बांधकाम सुरू झालेले नाही. मागील दोन दशकांपासून संघर्ष करूनही खाशाबा जाधव यांच्या स्वप्नातील राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र अजूनही उभारले गेले नाही. त्यामुळे ऑलिम्पिकवीर खाशांबा जाधव यांची अहवेलना किती काळ सुरू राहणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या उपलब्ध 36 गुंठे जागेत बांधकाम सुरू होणे गरजेचे होते. न्यायालयाच्या निकालानंतर उर्वरित जागेत बांधकाम करणे शक्य आहे. मात्र, निधी मंजूर असूनही आजवर साधी टेंडर प्रक्रियासुद्धा झालेली नाही.
-रणजित जाधव, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे पुत्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news