

कराड : कराड शहरामध्ये एकूण 67 इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. नगरपालिकेने शहरातील या धोकादायक इमारतीच्या मालकांना इमारती उतरवण्याबाबत नोटीस दिली आहेत. पालिका इमारत मालकांना वेळोवेळी नोटिसा बजावणी करत आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भविष्यात या इमारती ढासळल्या तर मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कराड शहरात दिवसेंदिवस इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 40 वर्षांपूर्वी दगड, माती आणि लाकडापासून बांधण्यात आलेल्या इमारतींची अवस्था आता अगदी गंभीर बनली आहे. काही इमारतींचे दरवाजे, भिंती धोकादायक झालेले आहेत. इमारती खाली वाकलेल्या आहेत तर कडीपाड खुजला आहे. अशा जीर्ण झालेल्या इमारती शहरातील दाटलोक वस्तीच्या ठिकाणी असल्याने त्या पावसाळ्यात ढासळून जीवितहानी व वित्तहानी होण्याची जास्त शक्यता असते.
काही ठिकाणी अगदी वीस वर्षांपूर्वीच्या इमारतींचे नूतनीकरण करण्यात येते त्यामुळे अशा धोकादायक इमारती शेजारी एखादे बांधकाम सुरू असेल तर जुन्या इमारती ढासळण्याची शक्यता असते. काही इमारतींच्या न्यायालयीन वाद सुरू आहेत तर काही इमारतींच्या भाडेवाद सुरू असल्याने वर्षानुवर्षे या इमारती जैसे थे राहिले आहेत. शहरातील काही इमारती गजबजलेल्या ठिकाणी रस्त्याकडे आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते त्यामुळे तात्काळ अशा इमारतींना नगरपालिकेकडून नोटीसा दिली आहे. शहरातील शनिवार पेठेत सर्वाधिक धोकादायक इमारती आहेत. तसेच गुरूवार पेठ व रविवार पेठेत 12 धोकादायक इमारती आहेत. इमारत मालकांनी वेळीच लक्ष द्यावे अन्यथा अनर्थ झाल्यास स्वत:इमारत मालक जबाबदार राहणार आहेत. परंतु यामध्ये कोणाला इजा झाल्यास किंवा कोणी जायबंदी झाल्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
नगरपालिकेने यंदाही 23 मे रोजी याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली असून संबंधित इमारतीच्या मालकांनी संभाव्य जीवित वित्तहानी होऊ नये या द़ृष्टीने धोकादायक इमारतीत तातडीने उतरावावेत, अन्यथा अनर्थ घडल्यास नगरपालिका यास जबाबदार राहणार नाही, असे इमारत मालकांना बजावले आहे. शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा देऊनही इमारत मालक याकडे तितक्याशा गांभीर्याने पाहत नाहीत.