सातारा : आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प | पुढारी

सातारा : आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

सातारा; पुढारी वृत्तसेवा : प्रतापगड पासून काही अंतरावर असणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळ्याची घटना आज (दि. २७) घडली. या दुर्घटनेमुळे दगड व माती रस्त्यावर आल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंट जवळ दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आंबेनळी घाट दोन्ही बाजूंकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रतापगड रेस्क्यू टीम सदस्यांसह स्थानिकांच्या मदतीने दरड हटविण्याचे काम सुरु आहे. मंगळवारी (दि. २७) रात्री १० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. दगड व माती हटविल्यानंतर वाहतूक पुर्ववत सुरु होईल अशी माहिती घटनास्थळावरुन मिळत आहे. घटनास्थळावरुन अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही.

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर झालेल्या दुर्घटनेनंतर प्रवाशांनी ताम्हेणी घाटातून जाणाऱ्या मर्गाचा अवलंब करावा अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

Back to top button