Fraud Investment : ४ टक्के परताव्याच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक

Fraud Investment : ४ टक्के परताव्याच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक
Published on
Updated on

कराड; पुढारी वृत्तसेवा : प्राईमबुल्स मल्टीकॉन कंपनीत पैसे गुंतवल्यास प्रति महिना चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांची सुमारे ५० लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २२ ते मे २३ या कालावधीमध्ये ही घटना घडली. यामुळे कराडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हणमंत भगवान लोखंडे (रा. बहे-तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली), प्रमोद बाळू लोंढे (रा. मुंढे, ता. कराड) व प्रकाश सदाशिव नायकवडी (रा. विंग, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शहाजी गणपती पाटील (रा. बहे-तांबवे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, तांबवे येथील शहाजी पाटील यांना गावातीलच हणमंत लोखंडे याने चार टक्के परतावाच्या अश्वासनाने काही रक्कमेची मागणी केली. यावेळी त्याने पाटील यांना, "मी प्राईमबुल्स मल्टीकॉन या कंपनीत डायरेक्टर पदावर आहे. तुम्ही जी रक्कम गुंतवणार त्याचे मला दोन टक्के कंपनीकडून कमिशन मिळते व तुम्हाला चार टक्के परतावा मिळणार आहे. तसेच तुमच्याकडे आत्ता पैसे नसतील तर तुम्ही कर्ज काढून पैसे भरा फायदा मिळेल. तसेच सदर रकमेचे एक वर्षानंतरचे चेक तुम्हाला देणार असल्याने मूळ रकमेची पूर्ण खात्री आहे," असे सांगितले. त्यानंतर लोखंडे हा शहाजी पाटील यांना घेऊन मलकापूर तालुका कराड येथील कृष्णा हॉस्पिटलसमोर असलेल्या प्राईमबुल्स मल्टीकॉन कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला‌‌. याठीकाणी शहाजी पाटील यांची प्रमोद लोंढे व प्रकाश गायकवाड यांच्याशी भेट घालून दिली. त्यावेळी त्यांनीही शहाजी पाटील यांना तुम्हाला चार टक्के परतावा मिळेल निर्धास्त रहा, असे सांगितले.

शहाजी पाटील यांची गुंतवणूक

शहाजी पाटील यांनी हणमंतसह इतर काही लोकांवर विश्वास ठेवून पाच लाख रुपये कर्ज काढून त्यातील दोन लाख दहा हजार रुपये प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर पाठवले. त्यावेळी लोखंडे याने सदर रकमेचा प्रमोद लोंढे यांच्या अकाउंटचा चेक शहाजी पाटील यांना दिला. पुन्हा शहाजी पाटील यांनी पत्नी राजश्री पाटील हिच्या नावावर तीन लाख 80 हजार रुपये कर्ज काढले व ती सर्व रक्कम प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर पाठवली. या रकमेचा देखील चेक लोखंडे याने पाटील यांना दिला. तसेच या रकमेचे चार ते पाच हप्ते पाच टक्के परताव्याने शहाजी पाटील यांच्या बँक खात्यावर जमा केले.

परतावा मिळणे बंद झाल्यानंतर शहाजी पाटील आक्रमक

पैसै देण्याचे आणि परतावा देण्याचे हे सत्र ऑक्टोबर 2022 पर्यंत चालू होते. मात्र त्यानंतर लोखंडे यांच्याकडून पाटील यांना कोणताही परतावा देणे बंद झाले. त्यामुळे शहाजी पाटील यांनी लोखंडे, लोंढे व गायकवाड यांना याबाबत विचारणा केली असता मार्केट डाऊन आहे नंतर पैसे मिळतील, सहा महिने थांबा असे सांगण्यास सुरुवात केली. एक वेळ शहाजी पाटील यांनी मलकापूर येथे ऑफिसमध्ये जाऊन संबंधितांची भेट घेतली. त्यावेळीही त्यांनी काळजी करू नका तुम्हाला तुमच्या रकमेचा परतावा मिळेल असे सांगितले. त्यानंतर शहाजी पाटील यांनी जानेवारी 2023 मध्ये त्यांना दिलेला चेक वटविण्यासाठी बँकेत गेले असता प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर रक्कम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी तपास करीत आहेत.

आणखी काही जणांची फसवणूक

दरम्यानच्या कालावधीत आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची माहिती शहाजी पाटील यांना समजली. त्यानुसार विश्वास निवृत्ती मोहिते (3 लाख 10 हजार), मालोजी तातोबा सरगर (20 हजार), वसंतराव रामचंद्र देशमुख (2 लाख 10 हजार, सर्व रा. बहे-तांबवे, या. वाळवा, जि. सांगली) तसेच विनायक शिवाजी तोडकर (5 लाख 10 हजार) अक्षयकुमार बाळासाहेब पाटील (14 लाख 10 हजार) यांचीही फसवणूक झाली आहे. तर अमोल आनंदराव देसाई, सुयश उल्हास देसाई (दोघेही रा. वाठार, ता. कराड) यांचीही अनुक्रमे 12 लाख व 1 लाख रुपयांची, शैलेश परशुराम चव्हाण (रा. कार्वे नाका, कराड) व इतरांनी फसवणूक केल्याचे शहाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे फसवणुकीचा एकूण आकडा 49 लाख 50 हजार एवढा मोठा होत असल्याने खळबळ उडाली आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ

दरम्यान, याबाबत माहिती घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. तपासी अधिकारी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता मी बाहेरगावी आहे, कार्यक्रम असल्याने दोन दिवस येणार नाही, आल्यानंतर भेटू, रविवारी येणार आहे, नाईट ड्युटी केली आहे, सायंकाळी पाच वाजता भेटू, दिवसभर न्यायालयात होतो अशी वेगवेगळी कारणे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. फसवणुकीचा एवढा मेजर प्रकार असतानाही त्याबाबतची माहिती देण्यास का टाळाटाळ केली जात होती, हे समजून येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news