सातारा : कुलिंग सर्व्हिस दुकानावर वीज कोसळली | पुढारी

सातारा : कुलिंग सर्व्हिस दुकानावर वीज कोसळली

वरकुटे मलवडी : पुढारी वृत्तसेवा म्हसवड,ता. माण येथे शुक्रवारी दुपारी विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. या पावसातच म्हसवड शहरातील येथील एका कुलींग सर्व्हिस सेंटर दुकानावर वीज कोसळली. त्यामुळे आग लागून दुकानातील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. दुकानातील एसी, फ्रीजच्या गॅस टाक्यांचे स्फोट झाल्याने हवेत आगीचे लोट पसरले होते.

म्हसवड येथे शुक्रवारी वळवाच्या पावसाने हाहाकार उडाला. महादेवमळा येथे विद्युत खांब पडले. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या असून शहरातील रस्ते जलमय बनले होते. पावसाचे तांडव सुरू असताना विजांचा लखलखाट होत होता. यावेळी म्हसवड- विरकरवाडी या रस्त्यालगत दादा माणिक घोडके यांच्या कुलींग सर्व्हिस सेंटर या दुकानावर वीज कोसळली. त्यामुळे दुकानाने पेट घेतला. बघता बघता ही आग भडकली. दुकानातील एसी, फ्रीजमधील गॅसने पेट घेतला. आगीने रौद्र रुप धारण केले. नवीन एसी, कुलर, पंखे व फ्रिज जळाले. अग्नीचे तांडव पाहून कोणीच पुढे जाण्याचे करत नव्हते. शेवटी अग्निशमनच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते.

Back to top button