सदाभाऊ खोत यांचा साता-यात रास्‍ता रोको; तीन दिवसात निर्णय झाला नाही तर मंत्रालयावर धडक मारण्याचा इशारा | पुढारी

सदाभाऊ खोत यांचा साता-यात रास्‍ता रोको; तीन दिवसात निर्णय झाला नाही तर मंत्रालयावर धडक मारण्याचा इशारा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाय, रयत क्रांती संघटनेचा विजय असो, सदाभाऊ तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्राचे आज साताऱ्यात आगमन झाले. तत्पूर्वी शिवराज चौकात खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर पदयात्रा बॉम्बे चौकातून सातारा शहरातील पोवई नाका येथे आली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कऱ्हाड (जि.सातारा) येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ या पदयात्रेस प्रारंभ झाला होता. आज ही यात्रा साताऱ्यात दाखल झाली. तत्पूर्वी खिंडवाडी ते शिवराज पेट्रोलपंपाच्या दरम्यान, यात्रा आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी महामार्गावरच ठिय्या मारला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. आमच्या मागण्यांकडे लक्ष दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे सदाभाऊंनी ठणकावले. कऱ्हाडमधून साताऱ्यापर्यंत आम्ही गावगाढ्याचे प्रश्न घेवुन पदयात्रा काढली आहे. या तीन दिवसात सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देईल, अशी आशा असल्याचे खोत यांनी म्हटले आहे. तीन दिवसात निर्णय झाला नाही तर मुंबईला मंत्रालयावर धडक मारण्याचा इशाराही खोत यांनी दिला आहे.

Back to top button