कराड : शॉर्टसर्किटने ट्रॅक्टरच्या शोरूमला आग; ५५ लाखांचे नुकसान

कराड; पुढारी वृत्तसेवा : शॉर्टसर्किटमुळे ट्रॕक्टरच्या शोरूमला आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये शोरूममधील पाॅवर टेलर १३ ट्रॕक्टरसह विविध कंपन्यांचे स्पेअरपार्ट, फर्निचर, कॉम्प्युटर लॅपटॉप व १८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली. या आगीमध्ये सुमारे ५५ लाखाचे नुकसान झाले आहे. कराड शहरातील बैलबाजार रस्त्यालगत शनिवार (दि.१८) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कार्वे तालुका कराड येथील संतोष पाटील व संदीप पाटील या दोघा भावांनी चार महिन्यांपूर्वी पाॅवर टेलर ट्रॅक्टरचे गजानन इंटरप्राईजेस नावाने नवीन शोरूम सुरू केले आहे. कराड येथे बैल बाजार रस्त्यालगत लक्ष्मीनारायण चौकात हे शोरूम आहे. या शोरूमच्या माध्यमातून ते शेतीच्या कामासाठी उपयुक्त असलेले पॉवर टेलर तसेच त्या ट्रॅक्टरसाठी लागणारे विविध कंपन्यांचे स्पेअर पार्ट, ऑइल याची विक्री करतात. शुक्रवारी रात्री शोरूम बंद करून ते घरी गेले. त्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शोरूमच्या समोरील रस्त्यावरून एक रिक्षावाला जात असताना त्याला शोरूममधून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. या रिक्षावाल्याने लगेचच संतोष पाटील यांना फोन करुन याची माहिती दिली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दरम्यान अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.
शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. जमलेल्या नागरिकांनी शोरूमच्या शटरचे कुलूप तोडून शटर उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु आतील आगीमुळे व धुराच्या लोटांमुळे शटर उघडताना नागरिकांना त्रास होत होता. तशाही परिस्थितीमध्ये नागरिकांनी तीन ते चार फूट अंतरावरती शटर उचलले. तेवढ्या उचललेल्या जागेमधून अग्निशामक दलाने पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत शोरूम मधील सुमारे २६ लाख रुपये किमतीचे तेरा पॉवर टेलर, साडेसोळा लाख रुपयांचे विविध कंपन्यांचे स्पेअर पार्ट, दोन कॉम्प्युटर, लॅपटॉप फर्निचर, टायर जळून सुमारे ५५ लाखांचे नुकसान झाले होते. या घटनेची पोलीसांत नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पाडव्याच्या मुहूर्तासाठी १४ नवीन ट्रॅक्टरची ऑर्डर
पाडव्याच्या मुहूर्तावर विक्री करण्यासाठी पाटील बंधूंनी सुमारे १४ नवीन ट्रॅक्टरची ऑर्डर कंपनीला दिली होती. त्यापैकी चार ट्रॅक्टर शुक्रवारी सायंकाळी शोरूममध्ये आले होते. तर इतर दहा ट्रॅक्टर घेऊन आज शनिवारी कराडमध्ये येणार होते. तत्पूर्वीच पहाटे लागलेल्या आगीत संपूर्ण शोरूम जळून खाक झाले. यामध्ये पाटील बंधूंचे मोठे नुकसान झाले आहे. संतोष पाटील व संदीप पाटील यांनी सकाळी संपूर्ण आग विझवल्यानंतर शोरूमची परिस्थिती पाहिली. आगीत शोरूम मधील सर्वच साहित्य जळाल्याने संदीप पाटील यांना धक्काच बसला. ते अचानकपणे जमिनीवरती कोसळले. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.