महाबळेश्वरमध्ये रेस्टॉरंटला आग; बाजारपेठेत धुराचे लोट | पुढारी

महाबळेश्वरमध्ये रेस्टॉरंटला आग; बाजारपेठेत धुराचे लोट

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका खासगी रेस्टॉरंटमधील चिमणीने पेट घेतल्याने बाजारपेठेत सर्वत्र धुराचे लोट आले पेटलेल्या या आगीवर स्थानिक व्यापाऱ्यांसह पालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने नियंत्रण मिळविण्यात यश आले.

महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी अमन रेस्टॉरंट शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चिमणीमधून धुराचे लोट येत होते. या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या लक्षात आले रेस्टोरंटच्या वरील बाजूस आगीने पेट घेतला होता. आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी तातडीने याबाबतची माहिती हॉटेल मालक सय्यद याना दिली. स्थानिकांच्या मदतीने हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या पर्यटकांना तातडीने हॉटेलबाहेर काढण्यात आले. तसेच हॉटेलमधील गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले, दरम्यान अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पालिकेच्या अग्निशामक विभागास संपर्क साधण्यात आला पालिकेच्या अग्निशामक दलाच्या मदतीने अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. ही घटना शनिवारी (दि. १८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने पर्यटकांच्या स्थानिकांची मोठी गर्दी हॉटेल व परिसरात झाली होती आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समीर शेख ऍड संजय जंगम मंजूर शेख इरफान शेख ताजुद्दीन बागवान गोविंद कदम सर्फराज शेख गणेश भांगडिया मिलिंद खुरासणे आदींनी महत्वपूर्व भूमिका बजावली.

Back to top button