कराड : महामार्गावरील उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याने मोठ्या वाहनांची वाहतूकसेवा बंद; आमदार पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

कराड : महामार्गावरील उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याने मोठ्या वाहनांची वाहतूकसेवा बंद; आमदार पृथ्वीराज चव्हाण

कराड : पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. या अंतर्गत कराड व मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. यादरम्यान सकाळी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक कोंडीमध्ये अडकून गैरसोय होत आहे. या तक्रारींमुळे वाहतूक कोंडीवरती पर्यायी म्हणून व परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महामार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक सकाळी नऊ ते अकरा या वेळेत बंद ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्याची प्रायोगिक तत्त्वावरती मंगळवारी अंमलबजावणी केली असून हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कराड येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण प्रमुख उपस्थित होते.

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महामार्गाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असून या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. याबाबत मी मुंबईमध्ये असतानाच काही लोकांनी फोन करून माझ्याकडे तक्रार केली. त्यामुळे मी आल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पर्यायी मार्गांबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येतील, याबाबत माहिती घेतली. त्यानुसार दहावी, बारावी परीक्षांच्या वेळांचा विचार करून सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मोठ्या वाहनांना महामार्गावर दोन्ही बाजूला थांबवून ठेवणे व छोटी वाहने सोडून वाहतूक कायम ठेवण्याचा पर्याय समोर आला. त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केल्यानंतर तो प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा आहे तोपर्यंत मोठ्या वाहनधारकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, तोपर्यंत कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा असे दोन ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय कोल्हापूर नाक्यावरील पाडलेल्या उड्डाणपूलाचे साहित्य उचलल्यानंतर येथूनच यु-टर्न घेता येतो का याचीही पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे पुढे सर्व्हिस रस्त्यावरती येणारा ताण कमी होईल. तसेच नवीन पूल बांधण्याचे काम किमान दोन वर्षे चालणार आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदाराला दंड होणार आहे. यादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी म्हणून महामार्गाच्या दोन लेन कायम सुरू ठेवाव्यात अशा सूचनाही प्रशासनाला केल्या आहेत. तसेच कराड व परिसरातून कोल्हापूरकडे किंबहुना कराड दक्षिणच्या उंडाळे भागाकडे जाणाऱ्या लोकांनी कराड, बैल बाजार, मलकापूर ते नांदलापूर रस्त्याचा वापर करावा‌ हा पर्यायी रस्ता सोयेचा ठरत आहे. ढेबेवाडी फाट्यापासून या रस्त्याला जोडण्यासाठी जो रस्ता आहे. त्याचीही पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. याशिवाय पर्याय रस्त्यावरती असलेले खड्डे मुजवून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. ढेबेवाडी फाटा येथे रस्त्यावरील पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पोलिसांनी पर्याय काढणे गरजेचे आहे. याबाबत पुन्हा बैठक घेऊन येणाऱ्या अडचणीवरती चर्चा केली जाणार आहे असेही, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

दोन तासात लागेल आठ किलोमीटर रांग…

उड्डाणपुलाच्या कामामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठी वाहने थांबवून ठेवण्याची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. त्यामध्ये पंधरा मिनिटात 60 वाहने थांबवावे लागले असून त्याची सुमारे सव्वा किलोमीटरपर्यंत लांब रांग लागली. म्हणजेच मिनिटाला चार मोठी वाहने महामार्गावरून पास होतात. याचा अर्थ सकाळी दोन तास मोठी वाहने महामार्गाच्या दोन्ही बाजूला थांबवून ठेवल्यास अंदाजे दोनशे ते अडीचशे वाहने पार्क होतील. आणि त्याची सुमारे आठ किलोमीटर पर्यंत लाईन लागेल. मात्र त्यानंतर थांबवलेली वाहने महामार्गावरून सोडत असताना वीस मिनिटातच संपूर्ण वाहने महामार्गावरून मार्गस्थ होतील, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.

Back to top button