सातारा : मटका किंग समीर कच्छीसह टोळीवर मोक्का | पुढारी

सातारा : मटका किंग समीर कच्छीसह टोळीवर मोक्का

सातारा; पुढारी वृत्तसेवा : मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या ४६ साथीदारांवर संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. मटका व्यवसाय, व्याजाने पैसे देवुन सावकारी करणे, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्यासाठी टोळीने अनेक कृत्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी याच्यावर दि. १९ फेब्रुवारी रोजी मोळाचा ओढा, सातारा येथील पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. यावेळी एकुण १६ लाख २६ हजार ७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर संशयिताने त्याच्या साथीदारांच्या मार्फत मटका जुगार सारखे अवैध धंदे चालवून मोठया प्रमाणावर काळा पैसा गोळा केला. हा पैसा सामान्य कुटुंबातील गरजू लोकांना व्याजाने देऊन त्याद्वारे सावकारी करत लोकांची पिळवणूक केली असल्याचे समोर आले. त्यानुसार सावकारीचा गुन्हाही दाखल करण्यात आला.

मटका प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्याची लिंक गोवा राज्यापर्यंत गेल्यानंतर तेथूनही मटका बहाद्दर पकडण्यात आले. एका मागून एक धक्के दिले जात असताना 15 दिवसात समीर कच्छी टोळीवर मोक्काही ठोकण्यात आला. अद्याप याचा तपास सुरू आहे. संशयित आरोपी वाढण्याची शक्यताही आहे.

Back to top button