कराडकरांच्या अलोट प्रेमाने भारावून गेलो : खा. उदयनराजे भोसले | पुढारी

कराडकरांच्या अलोट प्रेमाने भारावून गेलो : खा. उदयनराजे भोसले

कराड : पुढारी वृत्तसेवा : कराडकरांच्या अलोट प्रेमाने भारावून गेलो आहे. जनतेच्या सेवेत नेहमीच कार्यरत राहणार असून राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव मित्र परिवाराच्यावतीने महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेल्या या बैलगाड्या शर्यतीचे केलेले आयोजन शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. अशा स्पर्धामुळे बैलांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले असून शेतकरी वर्गात उत्साह आला आहे, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीच्या मैदानाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ. आनंदराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. छ. खा. उदयनराजे यांचे कराडमध्ये आगमन झाल्यावर त्यांनी प्रथम शिवतिर्थावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विजयसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली मोटारबाईक रॅलीने उदयनराजेंना शर्यतस्थळी नेले. त्यांनी बैलगाडीतून रपेट मारली. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

बैलगाडी शर्यतीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील ३०० बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचा शुभारंभ हजारमाची गावचे उपसरपंच प्रशांत यादव यांच्या हस्ते झाला. हजारो शौकीनांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत बैलगाड्या विजेत्या ठरल्या. यामध्ये प्रथम क्रमांक ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी, दुसरा क्रमांक वाघजाई प्रसन्न दिनेश भांडले पुणे कळंबी, तिसरा क्रमांक ईश्वरी चंद्रकांत शेलार, चौथा क्रमांक बाबू माने, पाचवा क्रमांक अमोल माने सोन्या शंभू ग्रुप नरसिंहपुर, सहावा क्रमांक रमेश जाधव सुपणे, सातवा क्रमांक भानुदास कासेगाव या सातही गाड्यांना रोख रक्कम व छत्रपती चषक विजयसिंह यादव यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, स्मिताताई हुलवान, बाळासाहेब यादव, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, प्रीतम यादव, निशांत ढेकळे, ओंकार मुळे, विनोद भोसले, राहुल खराडे तसेच नागरिक, बैलगाडी शर्यत शौकिनांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव मित्रपरिवार, राजूभाऊ सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, जयवंतराव वीर, नितीन आवळे, पिंटू पाटील, योगेश पळसे, नरेश गुप्ता योगेश कोरडे यांनी परिश्रम घेतले. शर्यतीचे पंच म्हणून आबासाहेब जाधव, उदयसिंह पाटील, अशोक मदने, सागर धोकटे यांनी काम पाहिले.

Back to top button