कोणत्याही पक्षात असा ; आमच्या सोबत चला : पालकमंत्री शंभूराज देसाई | पुढारी

कोणत्याही पक्षात असा ; आमच्या सोबत चला : पालकमंत्री शंभूराज देसाई

उंडाळे : पुढारी वृत्तसेवा ;  राज्यभरात आजही स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कार्याचा गौरव होतो. त्यामुळे हा वारसा जपण्यासाठी कराड साताऱ्यात अडकून न पडता तुम्ही राज्य पातळीवर संपर्कात राहून काम करावे, असा सल्ला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काँग्रेस नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना दिला आहे. त्याचवेळी आमच्याबरोबर मुंबईला चला. मी याबाबत सातत्याने तुमच्या कार्यकर्त्यांजवळ ही खंत बोलून दाखवतो. आपण मोठा विचार करून राज्य पातळीवर काम करा. भले तर आपण आपल्याच पक्षात रहा, नाहीतर बाहेरील लोक म्हणतील साडू आला आणि वेगळेच सांगून गेला, असे व्हायला नको असे सांगण्यासही पालकमंत्री देसाई यावेळी विसरले नाहीत. कोयना सहकारी बँकेच्या ओंड (ता. कराड) शाखेच्या स्थलांतर शुभारंभावेळी ते बोलत होते.

निवृत्त कृषी पणन संचालक आणि अतिरिक्त सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, कोयना बँकेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमास कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल मोहिते, माजी सभापती • आप्पासाहेब गरुड, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थिती होते.

ना. शंभूराजे देसाई यांनी स्व. विलासराव पाटील यांचे नाव राज्यात स्वच्छ चारित्र्य व धडाकेबाज काम करणारा नेता म्हणून वलय होते. सातारा जिल्हा बँकेच्या यशात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था आज अॅड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे प्रगतीपथावर आहेत. पण, राज्यात काम करताना विलास काकांचा नातेवाईक म्हणून मला नेहमी त्यांच्या मुलाचे काय चालले आहे ? असा प्रश्न विचारला जातो. तेव्हा अॅड. उदयसिंह पाटील यांनी विलासराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सातारा आणि कराड येथे गुंतून न राहता आमच्याबरोबर मुंबईला चलावे.

मी याबाबत सातत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांजवळ ही खंत बोलून दाखवली आहे. कारण आपणास विलास काकांचा वारसा आहे व हा वारसदार राज्य पातळीवर काम करायला हवा, अशी इच्छा काकांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील जनतेची आहे. त्यामुळे आपण मोठा विचार करून इथेच न अडकून न राहता राज्यपातळीवर काम करा. भले तर आपण आपल्याच पक्षात रहा, नाहीतर बाहेरील लोक म्हणतील, साडू आला आणि वेगळेच सांगून गेला असे व्हायला नको, असे सांगण्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई यावेळी विसरले नाहीत.

दिनेश ओऊळकर यांनी राज्याच्या सहकारात साडेसात लाख कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक राज्याच्या बजेटपेक्षा अधिक आहे. त्यामुळे हा सहकार टिकला पाहिजे असे मत ओऊळकर यांनी व्यक्त केले. बँकेचे संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, स्व. विलासराव पाटील हे सहकार चळवळ टिकावी, यासाठी ते आग्रही होते. सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत डोंगरी भागात कार्य केले. त्यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून त्याला आपण साथ द्यावी, असे आवाहन अॅड. उदयसिंह पाटील यांनी केले.

बँकेचे चेअरमन रोहित पाटील यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सहकारी संस्था उपनिबंधक संदीप जाधव, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब गरुड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकारी संस्थांत राजकीय जोडे बाहेर ठेऊन काम करा

कोयना सहकारी बँकेच्या कार्याचा आर्थिक कार्याचा गौरव करून सहकारी कोयना बँकेने सहकारात आर्थिक शिस्त पाळल्याने संस्था प्रगतीपथावर आहे. सहकारी बँकात काम करताना राजकीय जोडे बाहेर ठेवून काम केले, तर संस्था प्रगतीपथावर येतील. सहकारी बँकांनी आर्थिक शिस्त पाळली, तर बँका पुढे कोणतीही अडचण येणार नाही, असेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Back to top button