जन आरोग्य योजनेचे पावणे तीन लाख लाभार्थी कार्डविना | पुढारी

जन आरोग्य योजनेचे पावणे तीन लाख लाभार्थी कार्डविना

सातारा : पुढारी वृत्तसेवा ;  देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना पाच लाखापर्यंत खर्चाचे उपचार मोफत मिळण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंमलात आणली. जिल्ह्यातील तब्बल ५ लाख ६९ हजार ३१४ लोक त्यासाठी पात्र ठरले आहे.. मात्र, आतापर्यंत केवळ १ लाख ९७ हजार ७४६ लोकांनीच कार्ड काढून योजनेत सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात या योजनेला साडेसातीच लागली असून अद्यापही तब्बल पावणेतीन लाख पात्र लाभार्थ्यांनी योजनेचे कार्डच घेतलेले नाही.

आयुष्यमान भारत योजनेला ४ वर्षे उलटून गेली असली तरी जिल्ह्यातील या योजनेचे आरोग्य अजूनही ढासळलेलेच आहे. या योजनेचा लाभ घेण्याकडे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे दुर्लक्ष होत आहे. या योजनेतून लाभार्थ्यांवर पाच लाख रुपये किमती पर्यंतचे उपचार विनामूल्य केले जातात. देशात १४ हजार, महाराष्ट्रात ९०० हून अधिक तर सातारा जिल्ह्यात २७ रुग्णालयात या योजनेतून उपचार केले जातात. तब्बल १ हजार २०९ आजारांवर या योजनेतून उपचार होतात. तरीही सर्वसामान्य, आर्थिक दुर्बल लोक या योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव आहे.

साताऱ्यातील संजीवन हॉस्पिटल, यशवंत हॉस्पिटल, श्री मंगलमूर्ती क्लिनिक अॅण्ड रिसर्च सेंटर, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, बालाजी श्रीनाथ हॉस्पिटल. कराडमधील शारदा क्लिनिक अॅण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, कोळेकर हॉस्पिटल, के. एन. गुजर हॉस्पिटल. फलटणमधील लाईफ लाईन हॉस्पिटल, चिरंजीवन हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर. कोरेगावचे श्रीरंग नर्सिंग होम हॉस्पिटल, खंडाळ्यातील मानसी मेमोरियल हॉस्पिटल, सावित्री हॉस्पिटल लोणंद, खटाव तालुक्यातील बी. जे. काटकर हॉस्पिटल, कृष्णाई आयसीयू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, चारुशीला अॅक्सिडेंट अॅण्ड प्रोमा केअर सेंटर, माणमधील धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, म्हसवड, दोलताडे हॉस्पिटल, जय भगवान हॉस्पिटल म्हसवड या हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत उपचार सुरू होणार आहेत.

तुम्ही पात्र आहात का हे पाहण्यासाठी मोबाईल क्रमांक, नाव, रेशन कार्ड नंबर किंवा आरएसबीआय यूआरएन नंबर टाकून पाहता येते. आरएसबीआय यूआरएन हा क्रमांक आशा स्वयंसेविका यांच्याकडे उपलब्ध असतो. तसेच ग्रामपंचायत, महा ई सेवा केंद्र तसेच ही योजना लागू असलेल्या २७ हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्रांकडे नोंदणी करुन करता येते.
-डॉ. देविदास बागल, जिल्हा समन्वयक

Back to top button